Join us  

अजित पवार पुन्हा निघाले शपथविधीला; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे असेही संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 3:29 PM

विधानसभा अध्यक्षांसमोर नेमका कोणता पेच निर्माण झालाय, की ज्यामुळे निर्णयात दिरंगाई होतेय,

मुंबई - शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवून पाच महिन्यांचा कालावधी लोटला. पाच महिन्यांनंतर ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाच्या निर्णयाचा आदर तरी राखा, असे न्यायालयाला सुनवावे लागले. ११ मेच्या निर्णयात न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यात सोयीस्कर होईल, असे काही मुद्देही स्पष्ट केले होते. त्यामुळे, पुन्हा एकदा आमदारांच्या अपात्रकेचा विषय चव्हाट्यावर आला आहे. न्यायालयाने सुनावल्यामुळे आता लवकरच हा निर्णय होईल, असे दिसून येते. मात्र, या घडामोडीत पुन्हा एकदा अजित पवारांच्यामुख्यमंत्रीपदाच्या र्चेचेला हवा मिळाली आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यानेही असेच सूचित केले आहे. 

विधानसभा अध्यक्षांसमोर नेमका कोणता पेच निर्माण झालाय, की ज्यामुळे निर्णयात दिरंगाई होतेय, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांकडून विचारला जाऊ लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ११ मे रोजी दिलेल्या निर्णयानंतर अपात्रतेच्या सुनावणीआधी शिवसेना कुणाची इथून सुरुवात करावी लागेल, असे नार्वेकर यांनी म्हटले होते. सुनावणीची तब्बल दीड महिना वाट पाहिल्यानंतर ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी ३ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत लवकरात लवकर सुनावणी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली. त्यानंतर, अध्यक्षांनी सुनावणीला सुरुवात केली आहे. मात्र, आता पुन्हा एकदा आमदारांच्या अपात्रतेवरुन राष्ट्रवादीत अजित पवार गट सक्रीय झाला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लवकरच विधानसभा अध्यक्ष आमदारांच्या अपात्रतेवर निकाल देतील, अशी चर्चा सुरू आहे. तसेच, या निकालानुसार मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरतील आणि अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी चर्चा रंगली आहे. यापूर्वीही राष्ट्रवादीच्या आमदारांकडून अशी विधाने खासगीत केली जात होती. त्यातच, गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने बनवलेला देखावा पाहता शिंदेंच्छा गच्छंती होऊन अजित पवार मुख्यमंत्री होतील, असेच त्यांनी सूचवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी घरातील गणपती बाप्पांसमोर हा शपथविधीचा देखावा साकारला आहे.

गणपती बाप्पांसमोर या शपथविधी देखाव्यातील दृश्यानुसार अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. या सोहळ्याला दिग्गजांची मादियाळी पाहायला मिळते. पंतप्रधान मोदी, अमित शहा, नितीन गडकरी, शरद पवार, रामदास आठवले, राहुल गांधी, फडणवीस, एकनाथ शिंदे, राज आणि उद्धव ठाकरे, संभाजी राजे, सुप्रियाताई या काल्पनिक शपथविधी सोहळ्याला उपस्थिती दाखविली लावल्याचे देखाव्यात दिसत आहे. तसेच, महानायक अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, रजनीकांत यांची उपस्थित आहे. मराठमोळ्या अशोक सराफ, सचिन पीळगावकरांचीही हजेरी दिसते. या काल्पनिक दृश्याचा वास्तावाशी काही संबंध नसला तरी, सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे भविष्यात संबंध जोडला जात आहे.  

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारमुंबईशिवसेनामुख्यमंत्री