मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार अखेर झालेला असून, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या अनेक आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. मात्र, अद्याप या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले नाही. यासंदर्भात मंत्रालयात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत खातेवाटप निश्चित झाले असून उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. खातेवाटपाबाबत निर्णय मुख्यमंत्र्यांचा असून खातेवाटप जवळपास निश्चित झाले आहे. उद्या संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच, कुणाला कोणते ऑफिस द्यायचे तेही आजच्या बैठकीत झाले. पालक मंत्र्यांबाबतही चर्चा झाली, आता अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या सोमवारी महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण 36नव्या मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा होती. मात्र अद्याप खातेवाटप जाहीर करण्यात आले नाही.