मुंबई - महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. या आघाडीकडून मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेतली. मात्र, संपूर्ण सत्तासंघर्षाच्या नाट्यात भाजपाची सगळ्यात मोठी कोंडी झाली. अजित पवारांना सोबत घेऊन भाजपाने #केलं. मात्र, अवघ्या साडेतीन दिवसात अजित पवारांनी राजीनामा दिला. त्यामुळे दिल्लीतील चाणक्यांची अखेरची खेळीही फेल ठरली. सिने अभिनेता आणि भाजपाचे पूर्वाश्रमीचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी महाराष्ट्रातील नवीन सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. तर, शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे कौतुक केलंय.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात, अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर भाजपा सरकार अल्पमतात गेलं. अखेर भाजपा सरकार कोसळलं. त्यामुळे अजित पवारांवर विश्वास का ठेवला? असा प्रश्न भाजपा नेत्यांमध्ये चर्चेत आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी विधिमंडळ नेते होते म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवला, तर याबाबत फडणवीसांनी योग्य वेळी बोलेन असं सांगून सस्पेन्स कायम ठेवला. याबाबत बुधवारी एका चॅनेलशी बोलताना अमित शहा म्हणाले की, अजित पवार हे राष्ट्रवादी आमदारांच्या विधिमंडळाचे नेते म्हणून निवडलेले होते. त्यांना सरकार बनविण्यासाठी निर्णय घेण्याचे अधिकार होते. राज्यपालांनीही सरकार बनविण्यावेळी त्यांच्याशी चर्चा केली होती. राष्ट्रवादीने पहिल्यांदा सरकार बनविण्यास समर्थता दाखविली त्या पत्रावरही अजित पवारांची स्वाक्षरी होती. आमच्याकडे पाठिंब्याचे जे पत्र आले त्यावर अजित पवारांची स्वाक्षरी होती. त्यामुळे भाजपाने त्यांना सोबत घेतले. मात्र, अजित पवारांनी घरवापसी केल्यानंतर भाजपा सरकार कोसळले.
महाराष्ट्रातील भाजपाच्या या पराभवावरुन शत्रुघ्न सिन्हा यांनी अजित पवार यांचं मोठ्ठ कौतुक केलंय. मॅन ऑफ अॅक्शन असे म्हणत शत्रुघ्न सिन्हा यांनी अजित पवारांचा उल्लेख केलाय. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांना हनुमान असं संबोधलं आहे. या राजकीय घडामोडीत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या संजय राऊत यांचं विशेष कौतुक आणि अभिनंदन असंही सिन्हा यांनी म्हटलंय. तसेच, महान मराठा नेता आणि आजचे लोहपुरुष, चाणक्य असं म्हणत शरद पवारांचं कौतुक केलंय. सुप्रिया सुळे यांचीही भूमिका यामध्ये महत्वाची असल्याचं सिन्हा म्हणाले.