Join us

भाजप-शिंदे गटाचा उल्लेख; अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले, “माझी ओळख दबंग नेता, पण...” 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 3:30 PM

Ajit Pawar: कुणाच्याही वैयक्तिक स्वार्थासाठी हा निर्णय पक्षाने घेतलेला नाही, असे अजित पवार यांनी ठामपणे सांगितले.

Ajit Pawar:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर कुणाकडे किती आमदार, याबाबत सस्पेन्स जवळपास संपुष्टात आल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या बैठका पार पडल्या. यावेळी अजित पवार गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा उल्लेख करत आवाहन केले. 

आताही अनेक आमदार माझ्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराला विचारा की, मी कधीही कुणावर भेदभाव केला नाही. उद्याही भविष्यात कुणाचे काम असेल तर ते करण्यासाठी भेदभाव करणार नाही. केवळ राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार असतील, त्यांनाही मला सांगायचे आहे की, माझी प्रतिमा महाराष्ट्रात एक दबंग नेता, एक कडक नेता, स्वतःला हवे तेच करतो, असा नेता, अशी झालेली आहे. मात्र, मी तसे होऊ देणार नाही. सर्वांना सोबत घेऊन जाणार, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. 

मंत्रिमंडळात अनेक चांगले निर्णय घेतले

सत्तेत आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक चांगले निर्णय घेतले. आधीचे सरकार गेल्यानंतर अनेक आमदारांची विकासकामे थांबली होती. ती पुन्हा सुरू करायची आहेत, असे सांगत आता जो निर्णय घेतलाय त्यानुसार, भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. तिघेही मिळून बहुमत प्रचंड आहे. सध्या ९ जणांना मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. पुढेही त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. वेगवेगळी खाती आणि पालकमंत्री पदे आपल्याला मिळणार आहेत. त्यातून निवडून आलेल्या आमदारांची कामे करता येणार आहेत. कुणाच्याही वैयक्तिक स्वार्थासाठी हा निर्णय पक्षाने घेतलेला नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठामपणे सांगितले. 

दरम्यान, अजित पवार व शरद पवार यांनी दोन वेगवेगळ्या बैठका बोलावल्या आहेत. या बैठकांना कोण कोण आमदार उपस्थित आहेत याची यादी समोर आली. अजित पवार यांच्या गटाने ४३ आमदार सोबत असल्याचा दावा केला आहे. तर शरद पवार गटाने १३ आमदार सोबत असल्याचा दावा केला आहे. 

टॅग्स :अजित पवारमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षराष्ट्रवादी काँग्रेस