मुंबई- गेल्या दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची पुण्यात गुप्त बैठक झाल्याचे बोलले जात आहे. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या, राष्ट्रवादी केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होणार असल्याचे बोलले जात आहे. यावरुन आता शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.
"...तरच अजित पवार मुख्यमंत्री"; काँग्रेसच्या दाव्यानंतर राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण
संजय राऊत म्हणाले, अजित पवार इतके मोठे नेते नाहीत की ते शरद पवारांना ऑफर देऊ शकतील. अजित पवार यांना पवारसाहेबांनी तयार केले आहे, शरद पवार यांना अजित पवारांनी बनवले नाही. पवार साहेबांनी संसदीय राजकारणात ६० वर्षांहून अधिक काळ घालवला आहे. चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
'शरद पवार हे त्यांच्या हयातीमध्ये भाजपसोबत हातमिळवणी करतील असं वाटत नाही. पवार हे महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते आहेत आमचे मार्गदर्शक आणि आमचे नेते आहेत.काल रात्री त्यांची आणि माझी फोनवरून चर्चा झाली. शरद पवार सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते सोलापुरात होते तिथे त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. आज ते पक्ष बांधणीसाठी संभाजीनगर ला आहेत.
शरद पवार आणि पुतणे अजित पवार यांच्यात शनिवारी १२ ऑगस्ट रोजी पुण्यात गुप्त बैठक झाली. या भेटीत शरद पवारांना ऑफर दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिल्यास केंद्रातील मोदी सरकारमध्ये त्यांना कृषीमंत्री किंवा NITI आयोगाचे अध्यक्ष बनवले जाऊ शकते, असं बोलले जात आहे. यासोबतच खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्रात तर राज्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना राज्य सरकारमध्ये मंत्रिपद देणार असल्याचे बोलले जात आहे.
महाविकास आघाडी मजबुतीने उभी
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आहेत आणि राहतील. महाविकास आघाडीत तेही राहतील आणि इंडिया अलायन्स मध्ये देखील राहतील, असंही राऊत म्हणाले.
मातोश्रीवर आजपासून बैठक
आजपासून चार दिवस महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी,जिल्हा प्रमुख, संपर्कप्रमुख, विधानसभेचे पदाधिकाऱ्यांच्या बैठका उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली होत आहेत. पुढील चार दिवसात संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा झडाझडती घेतली जाईल मग पुढची पावलं टाकली जातील, असंही संजय राऊत म्हणाले.