मुंबई-
मुंबईत मराठी भाषा भवनाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परप्रांतियांना सुनावलं. आपल्याच मुंबापुरीत यायचं, दोन पैसे कमवायचे, त्यानंतर आपल्या राज्यात हे पैसे पाठवायचे आणि वर मराठीला विरोध करायचा, असं करणाऱ्यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
मराठी भाषेच्या विरोधकांना पवारांनी खडेबोल सुनावलं. "महाराष्ट्रात राहायचं, मराठी भाषेला विरोध करायचा हे नैतिक ढोंग काही जण करतात. इथं राज्यात येऊन प्रगती करता आणि मराठी भाषेला, माणसाला विरोध का करता?", असा सवाल उपस्थित करत अजित पवार यांनी या मातीचे ऋण विसरू नका असंही आवाहन केलं.
दुकानांवर मराठी भाषेचे फलक लावावे यासाठी सरकारने कायदा केला. मात्र, त्याविरोधात कोर्टात जाणाऱ्यांना अजित पवार यांनी सुनावलं. "दुकानावर मराठी पाट्या लावण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि या निर्णयाविरोधात मराठी विरोधक मंडळी न्यायालयात गेली. मराठी पाट्या लावाव्यात कारण ते ग्राहकाच्या सोयीचं आहे असं न्यायालयानं यांना फटकारलं. महाराष्ट्रात राहायचं. मराठी भाषेला विरोध करायचा. माझं यांना एकच सांगणं आहे. इथं येऊन प्रगती करता आणि मराठी भाषेला कशाला विरोध करता?", असं अजित पवार म्हणाले.