मुंबई - राष्ट्रवादीचे राज्यातील मोठे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ते मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार घेत होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी प्रकृती ठीक असल्याचे सांगितले होते. गेल्या 8 दिवसांपासून कोरोनाशी झुंज देत अजित पवार यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे, आज त्यांना रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, पुढील काही दिवस ते विलगीकरणातच राहणार आहेत.
अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून होम आयसोलेशनमध्ये होते. आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर, त्यांनीही खुलासा करत कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या प्रकृतीवरून उलटसुलट चर्चा सुरु होत्या. त्यामुळे, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी अजित पवार पाच दिवसांत पुन्हा राज्याच्या सेवेत असतील, असे सांगितले होते. अजित पवार हे शिस्तीचे असल्याने त्यांना सर्व गोष्टी नीट व्हाव्यात असे वाटत होते. यामुळे ते कोरोना काळात दौरे, बैठकांचे सत्र करत होते. मात्र, काळजी घेऊनही त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांची प्रकृती उत्तम असून काळजीचे कारण नाही, असे त्यांनी म्हटले होते.
राज्यातील कोट्यवधी जनता व कार्यकर्त्यांची प्रार्थना तसंच डॉक्टर,नर्स, सपोर्ट स्टाफच्या प्रयत्नांमुळे मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, काही दिवस घरी विलगीकरणात राहणार आहे. माझ्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या हितचिंतकांचे आभार!, असे ट्विट अजित पवार यांनी केले आहे. राज्यातील आपल्या चाहत्यांना आणि कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी ट्विटरवरुन माहिती दिली.