अतुल कुलकर्णी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यासोबत उरलेल्या आमदार, खासदारांनी आमच्यासोबत यावे. आमच्या निर्णयाला शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावेत, या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत पुण्याचे सुप्रसिद्ध बिल्डर अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी गुप्त बैठक घेतली. आपण येणार नसाल तर पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आणि अन्य खासदारांना तरी पाठवा, अशी गळ अजित पवार यांनी यावेळी घातली.
पक्षात एकोपा रहावा. कुठलीही कटुता येऊ नये, यासाठी तुम्ही सुप्रिया सुळे यांना आमच्यासोबत पाठवा. त्यांना केंद्रात मंत्रिपदही मिळेल. पक्ष एकसंघ राहील. भाजप आणि राष्ट्रवादी असे मिळून आपण सत्तेत राहू शकतो. जे आमदार अजून सोबत आलेले नाहीत, त्यांनादेखील तुम्ही सोबत पाठवा. सुप्रिया सुळे सोबत आल्या, आपण आम्हाला आशीर्वाद दिला असे सांगितले तर सगळ्यांच्याच दृष्टीने ते चांगले होईल, अशी गळ अजित पवार यांनी घातल्याचे वृत्त आहे. मात्र, शरद पवार यांनी या गोष्टीला ठाम नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीची माहिती दुपारीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मिळाली होती. ते देखील तिथे पोहोचले. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात चर्चा होत असताना जयंत पाटील, अतुल चोरडियादेखील त्यावेळी उपस्थित होते.
या बैठकीची पूर्वकल्पना दिल्लीला होती. सगळ्या परिस्थितीवर दिल्लीचे वरिष्ठ नेते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारीक लक्ष ठेवून होते. पूर्वनियोजित आखणीनुसार हे चालू होते. अजित पवार पुन्हा एकदा शरद पवार यांना भेटतील. त्यावेळी कदाचित त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेलही असतील, असेही सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे वर्चस्व ज्या वर्गात आहे तो वर्ग भाजपला हवा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधीच हे ऑपरेशन पूर्ण करण्याची तयारी पडद्याआड सुरू झाल्याचेही वृत्त आहे.