मुंबई: धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांतील ८५; तर त्याअंतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील १४४ रिक्तपदांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. (Maharashtra ZP Election Results 2021) तथापि, भाजपच्या जागा मात्र घटल्याचे निकालावरून दिसते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी स्वतंत्र लढूनही मिळविलेल्या जागांची बेरीज केल्यास भाजपहून दुप्पट जागा पटकावल्याचे दिसते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया देत आगामी निवडणुकांमध्ये यापेक्षा मोठे यश मिळवू, असा विश्वास व्यक्त केला आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे निकाल आल्यानंतर मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली. या निकालाने ना आनंदी आहे ना दु:खी आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये यापेक्षा मोठे यश मिळवू, असे विश्वास पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
आमच्या तिघांची मते निश्चित जास्त होतात
प्रत्येकाला वाटत होते निवडणूक होऊच नये. कारण कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पूर्वीसारख्या जाहीर सभा घेता येत नव्हत्या. मतदारांपर्यंत पोहोचणे अवघड होते. परंतु या सगळ्या वातावरणात जिल्हा परिषद निवडणूक पार पडली. जनतेने समाधानकारक निकाल दिला आहे. पण असे असले तरी मी आनंदी पण नाही आणि दु:खी पण नाही. महाविकास आघाडी असली तरी आम्ही वेगळे लढलो होतो. आमच्या तिघांची मते पाहिली तर ती निश्चित जास्त होतात, असे अजित पवार यांनी यावेळी बोलताना नमूद केले.
विजयी उमेदवारांचे अभिनंदन
राज्यातील जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत विजय मिळवलेल्या राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन! प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राच्या हितरक्षणासाठी, ग्रामीण जनतेच्या विकासासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकजुटीनं कार्य करतील. जनतेचा विश्वास संपादन करुन पुढील निवडणुकांमध्ये याहून मोठे यश मिळवतील, असा विश्वास आहे, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्ते आणि विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.