पुणे - पुणे शहरासह जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार कायम प्रशासनाच्या संपर्कात आहेत. बैठका, चर्चा आणि उपाययोजनांसाठी पराकाष्टा करत अजित पवार आपल्या कामात स्वत:ला झोकून देत आहेत, असे आमदार कपिल पाटील यांनी म्हटलं आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी अजित दादा कुठं आहेत? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर, आमदार कपिल पाटील यांनी ब्लॉग लिहून अजित पवार यांच्या कामाची माहिती दिली.
कपिल पाटील यांनी लॉकडाऊन काळातही अजित पवारांच्या मंत्रालयीन उपस्थितीबाबत माहिती दिली. तसेच, एक-दोन प्रसंग सांगून अजित पवारांची काम करण्याची धडपड समजावून सांगितली आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रात असलेल्या उत्तर प्रदेशातील शिक्षकांबद्दलचा एक प्रसंग पाटील यांनी सांगितला आहे. विशेष म्हणजे या प्रसंगात अजित पवार यांच्याप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही मदत झाल्याचे पाटील यानी सांगितले. 'मी एकदा त्यांना म्हटलं यूपीतल्या शिक्षकांच्या कुटुंबियांना घरी जायचं आहे. त्यांना आश्चर्य वाटलं, की हिंदी भाषिक शिक्षक आपल्याकडे इतक्या मोठ्या संख्येने आहेत.
दादांनी विचारलं,इतके शिक्षक आहेत?
मी म्हटलं, हो.
पण दुसऱ्या क्षणी त्यांनी सचिवांना फोन लावला.
ट्रेन जात असेल तर कपिल पाटलांचंही काम करा.
पुढे एक श्रमिक ट्रेन शिक्षकांसाठी उपलब्ध झाली. शिक्षक, त्यांचे कुटुंबीय गावी पोचलेही.
आयत्यावेळी ती ट्रेन रद्द होणार होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणी मदत केली म्हणून ती ट्रेन गेली.
पण या सगळ्या काळामध्ये दादा कुठेही पडद्यावर येत नाहीत. पत्रकारांच्या कॅमेऱ्यासमोर जात नाहीत. पण पडद्यामागे राहून एखाद्या फिल्ड मार्शल सारखं तेही युद्ध लढत आहेत. ठाकरे सरकारचे खरे फिल्ड मार्शल हे अजित दादाच आहेत.' असे आमदार कपिल पाटील यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे.
दरम्यान, पुण्यातील वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता, भविष्यातील परिस्थितीचा विचार करून शहर, जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटल मधील तब्बल 80 टक्के बेड ताब्यात घेण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असलेले नियोजन करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले. दरम्यान कोरोना विषाणूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी सर्वच आघाड्यांवर प्रयत्न केले जात असले, तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन व त्यांच्या सहकार्याने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक अजित पवार यांनी नुकतीच घेतली आहे.