Join us

Ajit Pawar on MLA's Behavior: कुत्री, मांजरं, कोंबड्यांचं प्रतिनिधित्व आपण करत नाही; नितेश राणेंचं नाव न घेता अजित पवारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 3:02 PM

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session Maharashtra 2021) शेवटच्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधक काही मुद्द्यांवरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई: राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session Maharashtra 2021) शेवटच्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधक काही मुद्द्यांवरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नितेश राणे यांचे नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली. विधिमंडळातील सदस्यांच्या वर्तनाबाबत एक नियमावली प्रसिद्ध करण्यात आली असून, यासंदर्भात अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

नितेश राणे भाजप आमदारांसोबत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. भाजप आमदारांकडून पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली जात असताना शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सभागृहात पोहोचले. यावेळी नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज देण्यास सुरुवात केली. त्यानंतर आता सत्ताधारी महाविकास आघाडीने यावरुन नितेश राणे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली होती. यावरून अजित पवार यांनी परखड शब्दांत मते मांडली.

कुत्री, मांजरं, कोंबड्यांचं प्रतिनिधित्व आपण करत नाही

एका गोष्टीची मला खंत आहे. माझी मते मी स्पष्टपणे मांडतो. त्यामध्ये कधीही पक्षीय राजकारण आणत नाही. संससदीय सभ्याचार आणि शिष्टाचार हे पुस्तक सर्वांना वाचले पाहिजे. या सभागृहामध्ये निवडूण येताना लाखों मतदार तुमच्याकडे बघून मतदार करतात त्यातून तुम्ही या सभागृहाचे प्रतिनिधित्व करता. कुत्री, मांजरं, कोंबड्यांचं आपण प्रतिनिधित्व करत नाही याची जाणीव ठेवली पाहिजे. विधिमंडळाच्या आवारात प्राण्यांचा आवाज काढणे हा सभागृह सदस्यांचा आणि मतदारांचा विश्वासघात केल्यासारखे आहे. आपला माणूस तिथे जाऊन असे आवाज काढतो, टवाळी करतो यावर मतदारांना काय वाटेल. त्यामुळे सर्वांनीच ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे, या शब्दांत अजित पवार यांनी नितेश राणे यांच्या वर्तणुकीचा समाचार घेतला. 

आचारसंहितेचे पालन करणे सभागृहाच्या प्रत्येक सदस्याचे कर्तव्य

आचारसंहितेचे पालन करणे सभागृहाच्या प्रत्येक सदस्याचे कर्तव्य आहे. राज्यातला प्रत्येक जण विधीमंडळातल्या प्रत्येकाच्या वर्तनाकडे बारकाईने लक्ष ठेवून असतो. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे. सभागृहात येणारे सदस्य नगरपालिका, नगरपंचायत यांचा अनुभव घेऊन आलेले असतात. तर काही अगदीच नवखे असतात. त्यांना विधिमंडळाच्या कामकाजाबाबत अधिक माहिती नसते. विधिमंडळाचा सदस्या विधिमंडळाता आणि आवारात कसा वागतो, सार्वजनिक जीवनात तो कशा पद्धतीने वावरतो यातून केवळ त्या सदस्याचाच नाही तर सभागृहाची आणि विधिमंडळाची प्रतिमा ठरते आणि याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे, असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. 

सभागृहाच्या मान सन्मानाला नक्कीच धक्का बसला

गेल्या काही वर्षामध्ये आपल्यापैकी काही जणांच्या वर्तनामुळे सभागृहाच्या मान सन्मानाला नक्कीच धक्का बसला आहे. ही प्रतिमा आणखीन ढासळू नये. तिला उंचवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण सर्वांनी सभागृहातल्या विधिमंडळातल्या आवारात सार्वजनिक जीवनातल्या स्वतःच्या वर्तनाबद्दल अंर्तमुख होऊन विचार करण्याची गरज आहे, असा सल्ला अजित पवार यांनी दिला.  

टॅग्स :विधानसभा हिवाळी अधिवेशनअजित पवार