मुंबई - शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावरुन, गदारोळ झाला असतानाच राजकीय वातावरणही तापलं आहे. आज विधानसभेत या व्हिडिओच्या प्रश्नावरुन महिला आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिंदे गटाच्या नेत्या आणि आमदार यामिनी जाधव यांनी याप्रकरणी कारवाईची मागणी केलीय. तर, मनिषा चौधरी यांनीही अध्यक्ष महोदयांना, यामागील मास्टरमाईंडवर कारवाई करण्याची मागणी केलीय. विधानसभेत हा मुद्दा चर्चेला आल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यावर आपली भूमिका स्पष्ट केली.
शितल म्हात्रे व्हायरल व्हिडिओवरील चर्चेत अजित पवार यांनी स्पष्टपणे आपलं मत मांडलं. 'राजकीय क्षेत्रात किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना स्वतःचं चारित्र्य चांगलं ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. कारण, लोक आमच्याकडे ‘पब्लिक फिगर’ म्हणून पाहत असतात. त्यामुळे राजकीय मतं वेगवेगळी असू शकतात, मतमतांतरं असू शकतात. त्याबद्दल मला खोलात जायचं नाही', असे अजित पवार यांनी म्हटलं. तसेच, 'कुठल्याही लोकप्रतिनिधीने काही केलं नसताना कुणी जाणीवपूर्वक असे प्रकार केले, त्यामागे कुणी मास्टरमाईंड असेल, तर आमचं स्पष्ट मत आहे की, याची चौकशी झाली पाहिजे. 'दूध का दूध, पाणी का पाणी' झालं पाहिजे. वस्तूस्थिती काय आहे हे लोकांना आणि सभागृहाला कळली पाहिजे', अशी मागणीही अजित पवार यांनी सभागृहात केली.
सभागृहात महिला आमदार आक्रमक
पाँईंट ऑफ रिन्फॉर्मेशनअंतर्गत शिंदे गटाच्या नेत्या आणि आमदार यामिनी जाधव यांनी विधानसभेत शितल म्हात्रेंच्या व्हायरल क्लीपचा मुद्दा उपस्थित केला. व्हिडिओ मॉर्फींग करुन एका प्रतिष्ठीत महिलेचा, माजी नगरसेविकेचा हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला. एका महिलेनं कितीवेळा मीडियासमोर येऊन स्वत:ला सिद्ध करायचं की मी चुकीची नाहीये, अध्यक्ष महोदय या मॉर्फींगमुळं तिचं आयुष्य बरबाद होईल, ती विवाहित महिला आहे. म्हणूनच, याप्रश्न कुठली कारवाई केली जाईल, असा सवाल यामिनी जाधव यांनी विधानसभेत उपस्थित केला. तसेच, आमदार मनिषा चौधरी यांनीही शितल म्हात्रेंची बाजू घेत याप्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत
मला या व्हिडिओबाबत काहीही माहिती नसून आज सकाळीच, असा काही व्हिडिओ आहे, ही गोष्ट माझ्या वाचनात आली. पण, या व्हिडिओशी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा संबंध नाही. तुमची पापं लपवण्यासाठी, गुन्हे लपवण्यासाठी, तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांवर हात टाकणार असाल तर ते कायद्याचं राज्य नाही. कोणीही व्हिडिओ काढून व्हायरलं करतं, याचा आमच्याशी संबंध नाही, अशी स्पष्ट भूमिका खासदार संजय राऊत यांनी मांडली. तसेच, सार्वजनिक कार्यक्रमात कोणीही अशाप्रकारचं अश्लील वर्तन करत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.