Join us

अजित पवार म्हणाले, प्रवक्ते बोलतील; मिटकरींनी लगेच रोहित पवारांची खिल्ली उडवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 10:32 IST

रोहित एवढा मोठा नाही, मी त्याच्या प्रश्नावर उत्तर द्याव, माझे आमदार आणि प्रवक्ते उत्तर देतील, असे अजित पवार यांनी म्हटले होते.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. आपण आजही पुरोगामी विचारांचेच आहोत, आणि राहणार असे अजित पवार ठणकावून सांगत आहेत. तर, आमदार रोहित पवार यांनी विचारांची शिदोरी जपत शरद पवारांसोबत उभे राहण्याचं आवाहन राष्ट्रवादीच्या समर्थकांना केलंय. त्यातूनच, ते अजित पवार गटातील नेत्यांवर आणि अजित पवारांवरही टीका करताना दिसून येतात. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकल्यासंदर्भात अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना अजित पवारांनी रोहित पवारांना झिडकारलं

रोहित एवढा मोठा नाही, मी त्याच्या प्रश्नावर उत्तर द्याव, माझे आमदार आणि प्रवक्ते उत्तर देतील, असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यानंतर, आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन रोहित पवारांची खिल्ली उडवली आहे. तसेच, रोहित पवार हेच भाजपासोबत जाण्यासाठी इच्छुक होते, पण आता पुरोगामी असल्याचं सिद्ध करण्यासाठी धडपडत आहेत, असे मिटकरी यांनी म्हटले. ''बालमित्र मंडळाच्या अध्यक्षाला गगनाला गवसणी घालण्याचे डोहाळे लागलेले दिसतात. या अध्यक्षांनी भाजपसोबत जाण्यासाठी पवार साहेबांना अनेक वेळा गळ घातली. आता, स्वतःला पुरोगामी सिद्ध करायला वाटेल ते करायला तयार आहेत. शिर्डीच्या अधिवेशनात बोलू न दिल्याने अध्यक्ष फारच चिडलेत'', असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केलंय.

काय म्हणाले होते अजित पवार

आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ईडीचे छापे पडले. त्यानंतर रोहित पवार यांनी आठ दिवसापूर्वी दिल्लीला कोण गेले होते हे तपासा असा प्रश्न माध्यमांसमोर उपस्थित केला. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, कोण कधी आणि कुठे गेला होता याचा तपास करा. रोहित पवार यांच्या प्रश्नाला मी उत्तर द्यावं इतका तो मोठा नाही. त्याच्या प्रश्नाला माझ्या पक्षाचे प्रवक्ते व कार्यकर्ते उत्तर देतील. राज्यातील व केंद्रातील तपास यंत्रणा या स्वायत्त आहेत. त्या त्यांच्या पद्धतीने कारवाई करत असतात. जर काही केलेले नसेल तर घाबरण्याचे कारण नाही.", असे अजित पवार यांनी म्हटले होते.

टॅग्स :रोहित पवारअमोल मिटकरीराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार