Ajit Pawar News: महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांत मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकारणाला नवी कलाटणी मिळाली आहे. यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पुढील निवडणुका लढणार आहोत. आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस आहोत आणि घड्याळ चिन्हावर निवडणुका लढवणार, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
आम्ही सगळ्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आमच्याबरोबर जवळपास सर्व पक्ष आहे. आमदार, खासदार, नेते मंडळी आमच्यासोबत आहेत. मी आणि इतर सहकाऱ्यांनी मंत्रिमंडळात शपथ घेतली. मंत्रिमंडळात पुढे पुन्हा विस्तार केला जाणार आहे. त्यावेळी इतर सहकाऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न असणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच अनेक दिवस याबाबत चर्चा सुरू होती. त्यावेळी वरिष्ठ पातळीवर आम्ही सर्वजण एकत्र बसायचो. सध्या देशाची आणि राज्याची जी राजकीय परिस्थिती आहे त्याचा विचार करता विकासाला महत्त्व दिले गेले पाहिजे असे माझे आणि सर्व सहकाऱ्यांचे मत आले, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
पुढच्या निवडणुका PM मोदींसोबत लढणार, घड्याळ चिन्हावर
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ९ वर्षे देशाला मजबुतीने पुढे नेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, असे मत आम्हा सर्वांचे झाले. सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. फक्त बैठका होत आहेत. प्रत्येकाची वेगवेगळ्या राज्यात वेगळी परिस्थिती आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी पक्ष म्हणून आम्ही मंत्रिमंडळात सहभागी झालो आहोत. पुढे निवडणुका पक्ष चिन्हासोबतच लढवणार. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आम्ही त्यांच्यासोबत (भाजप) लढवू आणि त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. याशिवाय, महाराष्ट्रातील जनतेची इच्छा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांचा पाठिंबा, विश्वासाच्या बळावर राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. माझ्या या पदाचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी होईल असा विश्वास देतो, असे अजित पवार यांनी नमूद केले.
दरम्यान, नागालँडला निवडणुका झाल्या, तिथे पक्ष भाजपबरोबर गेला आहेत. काही जण आरोप करतील, साडेतीन वर्षांपूर्वी निर्णय घेतला होता. तेव्हा मविआने काम केले. आम्ही शिवसेनेबरोबर जाऊ शकतो तर भाजपबरोबर देखील जाऊ शकतो, त्यामुळे जातीयवादी हा आरोप योग्य नाही. पक्ष पुढे नेण्याचा प्रयत्न करणार. काही जण पोहोचू शकले नाहीत. काही परदेशात आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी मान्यता दिली, असे अजित पवार यांनी सांगितले.