Join us  

...अन् मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत अजित पवार बसले; शासकीय कार्यक्रमात काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 12:27 PM

या कार्यक्रम सोहळ्यासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर घडलेला एक प्रसंग सर्वांसाठी चर्चेचा विषय बनला आहे.

मुंबई – विधिमंडळ आमदारांसाठी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या नवीन मनोरा आमदार निवासाचं भूमिपूजन आज पार पडले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याहस्ते हा सोहळा झाला. परंतु या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याने ते गैरहजर राहिल्याचे बोलले जाते.

या कार्यक्रम सोहळ्यासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर घडलेला एक प्रसंग सर्वांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. या व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने खुर्ची आरक्षित होती. परंतु मुख्यमंत्री या कार्यक्रमाला न आल्याने ही खुर्ची रिकामी होती. तेव्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खुर्चीवरील स्टिकर बाजूला काढून टाकले आणि त्याठिकाणी अजित पवार बसले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत अजित पवार बसले असा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी आहे. त्यांना थोडी कणकण जाणवतेय म्हणून ते या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. अजित पवार अनावधानाने मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले असं शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं.

कसं असेल मनोरा आमदार निवास?

जुने मनोरा आमदार निवास पाडल्यानंतर त्याचठिकाणी नवीन मनोरा आमदार निवास इमारत उभारण्यात येत आहे. कोविड काळामुळे आणि सीआरझेडमुळे हे बांधकाम रखडले होते. आता १३४२९.१७ चौ. मी भूखंड क्षेत्रात ५.४ एफएसआय जागेवर हे बांधकाम होणार आहे. वास्तूकलेचा वारसा आणि आधुनिक स्थापत्यशैलीनुसार गरजा यांचा संगम साधून मनोरा आमदार निवासाच्या ४० मजली आणि २८ मजली अशा दोन भव्य इमारती उभारण्यात येणार आहेत.

या नवीन इमारतील आवश्यक त्या सर्व सुविधांनी परिपूर्ण ३६८ निवासस्थाने आमदारांसाठी असतील. विधिमंडळाच्या सर्व सदस्यांना एकाच ठिकाणी राहण्याची व्यवस्था करणे शक्य होणार आहे. प्रत्येक रुम १००० चौ. फूट असेल. दोन्ही इमारतींमध्ये एकाच वेळी ८०० हून अधिक वाहने उभी करण्यासाठी पार्किंगची सोय असेल. त्याशिवाय स्वयंपाकगृह, हॉल, प्रत्येक मजल्यावर कॉन्फरन्स रुम, व्हिआयपी लाऊंज, फिटनेस सेंटर, कॅफेटोरिया, बिझनेस सेंटर, बुक स्टोअर, लायब्ररी, क्लब हाऊस, मिनी थिएटर अशा सुविधा देण्यात येतील.

टॅग्स :अजित पवारएकनाथ शिंदेराहुल नार्वेकर