Join us

बिनविरोध ग्रामपंचायतींना बक्षिसं देणं कितपत योग्य?, अजित पवार म्हणतात...

By महेश गलांडे | Published: January 07, 2021 1:12 PM

मुंबई महानगरपालिकेतील निवडणुकीच्या रणनीतीबाबत अजित पवार म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेमध्ये आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मित्रपक्षांसोबत मिळून ही निवडणूक लढवावी, अशी चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक ही गटातटांची असते, या निवडणुकीत पक्षीय राजकारण चालत नाही. कुठल्या ग्रामपंचायतीचा सदस्य हा कुठल्या पक्षाचाय हे अजिबात कळत नाही. कारण, तिथं पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली जात नाही, तिथं एबी फॉर्म नसतो.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीबाबत सूचक आणि मोठे विधान केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी करून लढण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे संकेत अजित पवार यांनी दिले. यासोबत ग्रामपंचायत निवडणुकांसाठी भाजपा नेत्यांचा प्रचार म्हणजे केविलवाणा प्रयत्न आहे. कारण, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारण नसतं, अशी टीका अजित पवार यांनी भाजपा नेत्यांवर केलीय.  

मुंबई महानगरपालिकेतील निवडणुकीच्या रणनीतीबाबत अजित पवार म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेमध्ये आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मित्रपक्षांसोबत मिळून ही निवडणूक लढवावी, अशी चर्चा सुरू आहे. मात्र या बाबतचा अंतिम निर्णय शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे घेणार आहेत. आघाडी करून लढल्याने मतविभागणी रोखता येईल. अन्यथा तुला नाही मला, दे तिसऱ्याला असं होईल, असे अजित पवार म्हणाले. तसेच, ग्रामपंचायत निवडणुकांमधील चुरस, पक्षीय राजकारण आणि बिनविरोध निवडणुकांसदर्भातही त्यांनी आपलं मत माडलं.  

ग्रामपंचायत निवडणूक ही गटातटांची असते, या निवडणुकीत पक्षीय राजकारण चालत नाही. कुठल्या ग्रामपंचायतीचा सदस्य हा कुठल्या पक्षाचाय हे अजिबात कळत नाही. कारण, तिथं पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली जात नाही, तिथं एबी फॉर्म नसतो. त्या ग्रामपंचायतीचं ज्यांच्याकडे काम असतो, तो सरपंच त्यांच्याकडं जातो अन् मी तुमच्याच पक्षाचाय असं म्हणून काम करुन घेत असतो. त्यामुळे, या निवडणुकीला पक्षीय राजकारण नसतं. विधानपरिषद निवडणुकीत दारुण पराभव झाल्यामुळे, उगेच कुठतरी आपण काहीतरी काम करतोय हे दाखवून देण्याचा हा प्रयत्नंय. अर्थात हा त्यांच्या पक्षाबद्दल काय करायचं हा चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे.  मी 30 वर्षे ग्रामपंचायत निवडणूक जवळून पाहत आलोय, आमच्या तालुक्यात तर दोन गट असतात. जो गट निवडणूक येतो, तो म्हणतो दादा आम्ही तुमच्याच पक्षाचे, आम्ही साहेबांच्या गटाचे आहोत. मग, आम्हीपण हार, शाल अन् श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करतो, ही पद्धत आहे. तसेच, यावेळी ग्रामपंचायत निवडणुकांच्या बिनविरोध निवडणुकीसंदर्भात बक्षीसांबद्दलही अजित पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं. आम्ही वाचलं की ही ग्रामंपचायत बिनविरोध, ती ग्रामपंचायत बिनविरोध झाली. कोण बिनविरोध करेल, त्याला 25 लाखांचं बक्षिस, असं जाहीर केल्याचंही बातम्यांत आलं. त्यावरही खूप चर्चा झाली, की हे कितपत योग्य,अयोग्य. पण तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, त्यामुळे त्यांनी त्यासंदर्भातील शहनिशा करायची आणि काय निर्णय घ्यायचा ते ठरवायचं, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघात बिनविरोध ग्रामपंयात निवडणुकांसाठी बक्षीस जाहीर केलं होतं. त्यावरुन, भाजपा नेते राम शिदें यांनी रोहित पवारांवर टीका केली होती.  

नामांतरणाच्या मुद्द्यावर अजित पवार म्हणतात...

या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे, अजित पवार म्हणाले की, बुधवारी रात्रीपासून या विषयावर बातम्या ऐकायला मिळत आहेत, मला याबाबत काहीच माहिती नाही, सकाळपासून मी जनता दरबार घेत आहे, त्यामुळे आता मंत्रालयात गेल्यावर संबंधित पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बसून चर्चा करू, आम्ही समान किमान कार्यक्रम घेऊन सरकार चालवत आहोत, त्यामुळे एकत्र बसून यावर निर्णय घेऊ असं म्हणत नामांतरणाच्या वादावर अधिकचं भाष्य करणं टाळलं आहे. 

टॅग्स :अजित पवारग्राम पंचायतनिवडणूक