Join us

Diwali 2021: “यंदाची दिवाळी राज्याला करोनामुक्तीकडे नेणारी ठरो”; अजित पवारांनी दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 12:12 AM

Diwali 2021: दिवाळीतील दिव्यांच्या रोषणाईने अंध:कार दूर होऊन सर्वांचे जीवन प्रकाशमय होवो, अशा शब्दांत अजित पवार यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या. 

मुंबई: देशभरात दिवाळीची धूम सुरू आहे. धनत्रयोदशीनंतर नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन एकाच दिवशी आले आहे. देशभरात कोरोनाची दुसरी लाट बहुतांश प्रमाणात कमी झालेली पाहायला मिळत आहे. यामुळे देशवासीयांना आनंद द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दीपोत्सवानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाची दिवाळी राज्याला करोनामुक्तीकडे नेणारी ठरो, अशी सदिच्छा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. 

यंदाची दिवाळी सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. दिवाळीतील दिव्यांच्या रोषणाईने अंध:कार दूर होऊन सर्वांचे जीवन प्रकाशमय होवो, अशा शब्दांत अजित पवार यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या. 

परंपरा आपण यंदाही कायम ठेवूया

दिवाळी साजरी करत असताना समाजातील गरीब, वंचित, दुर्बल बांधवांना आनंदात सहभागी करून घेण्याची परंपरा आपण यंदाही कायम ठेवूया. दिवाळी हा दिव्यांच्या रोषणाईचा, प्रकाशाचा, सर्वांना सोबत घेऊन आनंद साजरा करण्याचा सण. दिवाळीतील दिव्यांच्या प्रकाशानं आपल्या सर्वांच्या जीवनातील अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी परंपरांचा अंध:कार दूर होवो. राज्यातल्या प्रत्येक घरात धन-धान्य, सुख-शांती, उत्तम आरोग्याची समृद्धी येवो, असे अजित पवार म्हणाले. 

आरोग्यदायी दिवाळी साजरी करूया

कोरोना व प्रदुषण प्रतिबंधक नियमांचे पालन करून आरोग्यदायी दिवाळी साजरी करूया, असे आवाहन करत गेल्या दिवाळीत कोरोनाची स्थिती गंभीर होती. त्यामुळे अनेक निर्बंधही लावण्यात आले होते. त्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत निर्बंधांतून बऱ्यापैकी मुक्ती मिळालेली आहे. कोरोनाची साथही सध्या नियंत्रणात आहे. यंदाची दिवाळी राज्याला करोनामुक्तीकडे नेणारी ठरो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :अजित पवारदिवाळी 2021