मुंबई- काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच सर्व बंडखोर नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीतील नवनियुक्त 9 मंत्र्यांसह इतर नेतेही उपस्थित होते. राष्ट्रवादीतील बंडखोर नेते अचानक शरद पवारांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. यानंतर अजित पवार गटातील नेते प्रफुल्ल पटेल यांनी या भेटीचे कारण सांगितले.
शरद पवारांच्या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, "अजित पवारांच्या नेतृत्वात, छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांच्यासह आम्ही सर्व नेते आमच्या सर्वांचे दैवत, आमचे नेते शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. आम्ही त्यांना वेळ मागितला नव्हता, आम्हाला समजले की, शरद पवार यशवंत चव्हाण सेंटरला बैठकीसाठी आले आहेत. संधी साधून आम्ही सगळे त्यांना भेटालो, त्यांचा आशीर्वाद घेतला."
"आम्ही सर्वांनी त्यांना विनंती केली की, राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ कसा राहू शकतो, यासाठी त्यांनी योग्य विचार करावा आणि येणाऱ्या दिवसांत आम्हाला मार्गदर्शन करावे. पवार साहेबांनी आमचे म्हणने शांतपणे ऐकून घेतले, पण कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. उद्यापासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. राष्ट्रवादीचे मंत्री अजित दादांच्या नेतृत्वात उद्यापासून आपापल्या विभागाची जबाबदारी विधासभेत पार पाडतील."