Join us

राजीनाम्यानंतर अजित पवारांचा 'माफीनामा', सर्वांची माफी मागतो अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 3:51 PM

शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी आज पवार कुटुंबीयांची भेट झाली. या भेटीला सुप्रिया सुळे, अजित पवार, शरद पवार आणि इतर पवार कुटुंबीयांनी उपस्थिती दर्शवली होती.

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजीनाम्याबद्दल खुलासा केला आहे. गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या राजानाम्याचं गुढ अजित पवारांच्या तोंडूनच उलगडलं आहे. अचानक राजीनामा दिल्यामुळे पक्षातील सर्वांनाच वेदना झाल्या, गोंधळ उडाला. ही माझी चूक होती की नव्हती हे मला माहिती नाही. पण, मी सर्वांची, कार्यकर्त्यांचीही माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच यापूर्वीच्याही एका राजीनामा प्रसंगाची आठवण अजित पवार यांनी करून दिली. 

शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी आज पवार कुटुंबीयांची भेट झाली. या भेटीला सुप्रिया सुळे, अजित पवार, शरद पवार आणि इतर पवार कुटुंबीयांनी उपस्थिती दर्शवली होती. तब्बल दीड तास पवार कुटुंबीयाची चर्चा सुरू होती. त्यानंतर अजित पवारांनी बाहेर येताच माझी भूमिका धनंजय मुंडे स्पष्ट करतील, असे सांगूत ते निघून गेले. तर दुसरीकडे, आमच्या कुटुंबात आईपासून एक पद्धत आहे. सर्व कुटुंबीय मिळून चर्चा करतात. ती चर्चा फक्त राजकीय होती असे नाही, काही कौटुंबिक चर्चाही होत असतात. चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही, अजित पवार पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करतील. सहकाऱ्यांशी बोलून ते अंतिम निर्णय घेतील, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर, अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्यावर मौन सोडले आहे. 

दरम्यान, शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान अजित पवारांनी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना राजीनामा मेल केला. त्यानंतर, अध्यक्ष बागडे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधून ‘‘आपल्याकडे मी राजीनामा दिलेला आहे, तो स्वीकारावा,’’ अशी विनंती केली. बागडे यांनी पत्रकारांना सांगितले की, योग्य फॉरमॅटमध्ये अजित पवार यांनी राजीनाम्याचे पत्र दिल्याने मी तो स्वीकारला. याबाबतचे वृत्त मीडियात येताच, राज्यात खळबळ उडाली होती. अनेकांनी अजित पवारांचा राजीनामा हे गृहकलह असल्याचं मत व्यक्त केलं होतं. तर, शरद पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने अस्वस्थ होऊन अजित पवारांनी राजीनामा दिला, असे पार्थ यांनी शरद पवारांना सांगितले होते, ते पवारांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.  

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारमुंबईराजीनामा