Join us  

"लोकांच्या भाजपवरील नाराजीचा फटका अजितदादांना"; RSS ने केलेल्या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 5:45 PM

भाजपला बहुमत असताना अजित पवार गटाला सोबत घेण्याची काय गरज होती? असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून विचारण्यात आला होता.

NCP Ajit Pawar Group Slams RSS : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला चांगलेच फटकारलं. संघाचं मुखपत्र असणाऱ्या ऑर्गनायझर मासिकात महाराष्ट्रातील अनावश्यक राजकारणाबाबत भाष्य करण्यात आलं होतं. या लेखातून राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचे खापर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर फोडण्यात आलं. मात्र आता भाजपावरील नाराजीचा फटका अजित पवारांना बसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर हे विधान केलं आहे. 

भाजपला लोकसभा निवडणुकीत अजित पवारांमुळे नुकसान झाल्याचे आरएसएसचे आजीवन सदस्य रतन शारदा यांनी म्हटलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला बहुमत असताना अजित पवार गटाला सोबत घेण्याची काय गरज होती? असा सवाल यातून विचारण्यात आला होता. "महाराष्ट्रात काही गोष्टी टाळता आल्या असत्या. जसे की, भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले गेले. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला. या एका कारणामुळे भाजपाने आपली किंमत कमी करून घेतली," असं या लेखामध्ये म्हटलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे.

रुपाली पाटील ठोंबरे यांनी सकाळच्या सुमारास अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांना आरएसएसने केलेल्या टीकेबाबत विचारण्यात आलं. लोकांच्या भाजपावरील नाराजीचा अजित पवारांना फटका बसला असे रुपाली ठोंबरे यांनी टीव्ही९सोबत बोलताना म्हटलं. "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत जी काही चर्चा झाली ती त्यांची अंतर्गत बाब आहे. पण, अजित पवारांना घेऊन त्यांचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. उलट नागरिकांमध्ये भाजपावरची जी काही नाराजी होती त्याचा अजित पवारांनाच फटका बसला असेल, असं म्हणणं योग्य ठरेल. या सर्व आरएसएसच्या अंतर्गत बाबी आहेत. मला त्या चर्चेबाबत काही बोलायचं नाही. त्यांनी कोणती चर्चा करावी किंवा कोणती चर्चा करू नये हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण अजित पवारांमुळे भाजपाला फटका बसला याबाबत महायुतीत कसलीही चर्चा नाही," असे रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं.

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसराष्ट्रीय स्वयंसेवक संघभाजपादेवेंद्र फडणवीस