Ajit Pawar vs Sharad Pawar, NCP: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या दोन गटांवरून राजकारण हळूहळू तीव्र होत चालले आहे. अजित पवारांनी आज मुंबईतील अमिटी येथे एक बैठक घेतली. तर शरद पवार यांच्या गटाने यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठका घेतले. "आज एक ऐतिहासिक सुरूवात झाली आहे असं मला वाटतं. "तेरे हर वार का पलटवार हूँ, यू ही नहीं कहलाता मै शरद पवार हूँ", हा केवळ एक डायलॉग नाहीये. कारण इथल्या सगळ्यांनाच एक विश्वास आहे की २०२४ ला नक्कीच परिवर्तनाची त्सुनामी येईल आणि त्यातून नवा उदय होईल. काही लोक म्हणत होते की, शरद पवार यांचे वय झाले आहे. अनेक पत्रकारांनी असे प्रश्न विचारले होते. त्यावर मी त्यांनी स्पष्ट सांगितलं की, शेर बुढा भी हो जाए तो घास नहीं खाता, शेर की दहाड अलग होती ही", असा शब्दात शरद पवार गटातील महिला नेत्या व युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी आपली भूमिका मांडली. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला.
"आम्हाला देखील फोन आले होते. आम्हालाही विचारणा झाली. विविध ऑफर्स आल्या. महामंडळ, विधान परिषद असे वेगवेगळे पर्याय देण्यात आले होते, पण आम्ही त्याकडे अजिबात पाहिलं नाही. मी त्यांना सांगितलं की बाजारू विचारवंत विधान परिषदेच्या आमिषाला बळी पडतात पण कष्टकरी कार्यकर्ता मात्र कायम साहेबांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी उन्हातान्हात काम करत राहतो. राज्यभरातील सर्वच जनता आपल्या साहेबांच्या सोबत आहे. मोदी-शहांच्या सरकारने जी ईडी संस्कृती बनवली आहे, त्या संस्कृतीला उत्तर देण्याची ही ताकद आहे. आपल्या साऱ्यांकडे शिवरायांचे विचार आहेत. आज जमलेले मावळे, हिरकण्या हेच तुमची ताकद आहेत अशा शब्दांत सलगर यांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना मांडल्या.
"शरद पवार यांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन राजकारण केले. त्यांनी कायमच सर्वसामान्य जनतेतील लोकांना नेता, आमदार केले आहे. त्यामुळे माझी साहेबांना विनंती आहे की तुम्ही नेतृत्व करतच राहा, पण त्यासोबतच या बाजारू बैलांना बाजार जरूर दाखवा. आम्ही सारेच तुमच्या सोबत आहोत. आम्हाला खासदारकी, आमकारकी नको. आम्ही केवळ तत्वासाठी, निष्ठेसाठी लढू. इतिहासात नोंद घेतली जाईल की या लोकांना कोणतंही पद, आमदाककी, खासदारकी नको होती पण तरीही त्यांनी लढा दिला. तितकंच आम्हाला हवं आहे," असे ते म्हणाले.