Join us  

"त्यात माझेही असतील दोन हात.."; 'पवार vs पवार' संघर्षावर रोहित पवारांनी केलं महत्त्वाचं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 12:54 PM

Rohit Pawar, NCP: "लोकहिताचं शस्त्र तर आहेच तुमच्या हाती... आता तुम्हीच उठा…"

Rohit Pawar Tweet, NCP Maharashtra Political Crisis: २०२२ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले. या सरकारला एक वर्ष होताच राज्यात आणखी एक मोठी घडामोड घडली. विरोधी पक्षात असलेल्या अजित पवार यांनी शरद पवारांच्या विचारांशी फारकत घेत भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच आहे, चिन्ह आणि पक्षाचे नावही आमचंचं आहे असा दावाही अजित पवार गटाने केला. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. या दोन पवारांच्या संघर्षामध्ये पवार कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीतील रोहित पवारांनी ट्विट करत महत्त्वाचे मत व्यक्त केले.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, "आज या दारात… उद्या त्या दारात... पण एक दिवस लोकांकडं जावंच लागेल, मग लोकांना काय सांगणार? तोंड कसं दाखवणार? काल तर कडवा विरोध होता.. मग आज अचानक गळ्यात गळा कसा? तो कोणता गळ आहे… ज्या गळाला लागला मासा! तुमच्या या चिखलात आम्ही का चालायचं? रोजचीच चिखलफेक बघत का बसायचं? अरे कुठं गेली तत्व अन् कुठे गेला विचार? किती दिवस आम्ही हेच ऐकायचं? जगण्याची, विचारांची बदलत चाललीय भाषा.. आता कुणाकडून करायची जनतेने आशा? भरवशाच्या म्हशीलाच झालाय टोणगा.. कोणता पक्ष... कोणता विचार.. अन् कसली निष्ठा.. इथं पसरलीय बरबटलेल्या राजकारणाची विष्ठा.. कालची भाषा एक होती... आज भलतंच बरळत आहेत... स्वार्थासाठी अनेकजण दात खाऊन पळत आहेत. कुठेय आपला तो सुसंस्कृत महाराष्ट्र... अन् कुठेय परंपरा?"

"निर्लज्जपणाचा झाला कळस… तुम्हाला येत नाही याची किळस? मत ज्यांची घ्यायची… त्यांचीच चेष्टा करायची ही कोणती रित? ज्या पिढीला आम्ही डोक्यावर मिरवली.. ती देशाला विचार देणारी पिढी आज कुठे हरवली? शिव-शाहू-फुले-आंबेडकर... तुम्ही महाराष्ट्र घडवला… तुमच्या पुरोगामी विचारांच रोपटं इथं रुजवलं.. पण आज याच रोपट्यावर होतेय का विखारी पावसाचं सिंचन? हे होत असेल तर रोखायचं कुणी? विष पसरवणाऱ्याला थोपवायचं कुणी? त्यासाठी साहेब…. लोकहिताचं शस्त्र तर आहेच तुमच्या हाती... आता तुम्हीच उठा… अन मैदानात उतरा… शेकडो… हजारो… लाखो… करोडो हात देतील तुम्हाला साथ.. त्यात माझेही असतील दोन हात.." अशा शब्दांत रोहित पवारांनी शरद पवारांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला.

टॅग्स :महाराष्ट्रातील सत्तासंघर्षशरद पवारअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसरोहित पवार