मुंबई - राज्यातील राजकीय घडामोडीनंतर अजित रात्री 10.00 वाजता घरातून बाहेर पडले आहेत. अजित पवारांसमवेत मोठो पोलीस फौजफाटा असून ते थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात पोहोचल्याचे समजते. अजित पवार शनिवारी रात्रीपासून घरातच होते, त्यामुळे त्यांच्या घराकडे मीडियासह सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. आज तब्बल 24 तासानंतर अजित पवार घराबाहेर पडले आहेत. यावेळी, माध्यमांनी त्यांना अडवले, पण त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारविरोधात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. जवळपास ५०-५५ मिनिटे या प्रकरणावर सुनावणी करण्यात आली. राज्यपालांनी कोणत्या कागदपत्राच्या आधारे निर्णय घेतला ते उद्या सकाळी 10.30 पर्यंत सादर करण्यात यावेत असे आदेश कोर्टाने महाधिवक्ता तुषार मेहता यांना दिले आहेत. त्यामुळे सत्तापेचावर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. तसेच सगळ्या पक्षकारांना कोर्टाने नोटीस जारी केली आहे. त्यामुळे अजित पवार हे उद्या न्यायालयात होणाऱ्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी चर्चा करायला वर्षा बंगल्यात पोहोचले आहेत. पार्थ पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अजित पवारांचे विश्वासू कार्यकर्तेही वर्षा बंगल्यात असल्याचे समजते.
सर्वोच्च न्यायालयातील कागदपत्रांसाठी महत्त्वाच्या ठिकाणी अजित पवारांच्या सह्या घेणं आवश्यक आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित वकिलांशी चर्चा करण्यात येईल. त्यासाठीच, अजित पवार घरातून बाहेर पडल्याची प्राथमिक माहिती आहे.