मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. राष्ट्रवादीती फूट लवकरच संपुष्टात येईल, असेही अनेकांना वाटत होते. मात्र, अजित पवार यांनी घेतलेला बंडाचा पवित्रा आणि शरद पवार गटातील नेत्यांना थेट दिलेलं आव्हान पाहाता, आता दोन्ही गटांचं मनोमिलन होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. एकीकडे ईडीच्या भीतीनेत काही जणांनी आमच्यापासून फारकत घेतल्याचं शरद पवार सांगतात. तर, दुसरीकडे माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनीही अजित पवारांवर थेट हल्लाबोल केला आहे. पुढील ३ महिन्यात अजित पवार तुरुंगात दिसतील, असे भाकीतच त्यांनी केलं आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या बंडामध्ये जमीन आस्मानाचं अंतर आहे. शरद पवारांचे बंड पक्षातील आमदार दुसरीकडे जाऊ नयेत यासाठी होते. तर अजित पवारांचे बंड स्वार्थासाठी होते. उपमुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी होते, अशी टीका शालिनीताई पाटील यांनी केली होती. आता, पुन्हा एकदा शालिनीताईंनी अजित पवारांवर थेट हल्लाबोल केला आहे. पुढील तीन महिन्यात अजित पवार तुरुंगात दिसतील, त्यामुळे त्यांना कुठल्याही निवडणुका लढवता येणार नाहीत. कारण, २०२४ मध्ये लोकसभा, विधानसभा या सर्व निवडणुका होत आहेत, असे शालनीताई पाटील यांनी म्हटले.
मी त्यांच्याविरुद्ध आता ३ अर्ज उच्च न्यायालयात दाखल करणार आहे. पुढील १० दिवसांत हे अर्ज दाखल होतील. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अजित पवार हे शिखर बँकेच्या २५ हजार कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार आहेत. म्हणून, महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांवर पहिला अर्ज असणार की, याप्रकरणी ताबडतोब दोषारोपपत्र ठेवा. आम्ही एफआयआर दाखल केलं आहे, त्यांच्यावर चार्जशीट ठेवा आणि अजित पवारांना न्यायालयात उभं करा, असे शालिनीताई पाटील यांनी म्हटलं.
५ वर्षे फुकट गेल्यामुळे हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात घेण्याची विनंती आम्ही न्यायालयात करणार आहोत. माझी प्रॉपर्टी ईडीच्या ताब्यात आहे, ती प्रॉपर्टी आमच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी आम्ही दुसऱ्या अर्जातून करणार आहोत. मोदींवर माझा विश्वास राहिला नाही, शिंदे-फडणवीस सरकार व्यवस्थित चाललं असताना तुम्हा अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं हे योग्य नाही, असेही शालिनीताई पाटील यांनी म्हटलं.
यापूर्वीही अजित पवारांना केले होते लक्ष्य
शालिनीताई यांनी म्हटलं होतं की, २०२४ मध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीस येतील. जो माणूस सख्ख्या चुलताचा, ज्याने तुम्हाला लहानाचं मोठं केले त्याचा विश्वासघात केला त्याच्यावर विश्वास का ठेवावा?, अजित पवारांवर कुणीही विश्वास ठेवणार नाही.अजितदादांसोबत गेलेली माणसं कोणत्या लायकीचे आहेत हे मी आधीच सांगितले. त्यात बाकी जे आमदार आहेत ते पुन्हा शरद पवारांकडे जातील. त्यानंतर जी दुर्दशा होईल. तुरुंगात आजीवन कारावास भोगून आलेल्या व्यक्तीसोबत जे होते. त्याला निवडणूक लढवता येत नाही. तसे होईल. १०५ कोटींचा भ्रष्टाचार केलेला हा माणूस आहे असं त्यांनी म्हटले होते.