मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आणि आमदार अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर ते राजकारणातून सन्यास घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता. विशेष म्हणजे, अजित पवारांनी पार्थला राजकारणात न येण्याचा सल्ला दिला. आपण, शेती किंवा उद्योग करू, असे अजित पवार म्हणाले होते. त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादी सोडणार का, अजित पवार वेगळा पक्ष स्थापन करणार का? अशा चर्चा राज्यभरात रंगल्या होत्या. या सर्व चर्चांना खुद्द अजित पवारांनीच पूर्णविराम दिला आहे. मी बारामतीतून लढणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. साहेबांचा आदेश मला मान्य आहे आणि त्यांनी मला तू बारामती लढवायची असं सांगितल्याचं अजित पवार यांनीच स्पष्ट केलंय.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजीनाम्याबद्दल खुलासा केला आहे. तसेच पवार कुटुंबियांत कुठलाही गृहकलह नसल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. आमच्या कुटुंबात कसलाही कलह नाही, कृपया करुन तसं काहीही अफवा पसरु नका. आमचं कुटुंब एकत्र असून पवारसाहेबांचा निर्णय कुटुंबात अंतिम मानला जातो. शरद पवार हे कुटुंबाचे प्रमुख असल्याने त्यांचा शब्द पाळला जातो, असे अजित पवार यांनी म्हटले. सुरुवातीला राजकारणात सुप्रिया आल्यावरही असंच उकरलं. नुकतंच पार्थही राजकारणात आल्यावर पुन्हा तेच, आता रोहित आल्यावरही पुन्हा तेच, असे म्हणत आमच्याच कुठलाही गृहकलह नाही, असे अजित पवार यांनी म्हटले. यावेळी, अजित पवारांना अश्रू अनावर झाले होते. अजित पवारांनी पत्रकार परिषदेत सगळ्या प्रश्नांचा उलघडा केला. आपल्या राजीनाम्याचेही कारण सांगितले.
गेल्या 30 वर्षांपासून मी प्रतिनिधित्व करत असलेल्या बारामती मतदारसंघातूनच मी विधानसभा निवडणूक लढणार आहे. जर आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी मला उमेदवारी दिली तर मी बारामतीमधूनच निवडणुकीच्या रिंगणात असेल, असे अजित यांनी म्हटले. त्यानंतर, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी, अजित दादांशिवाय बारामतीला आणि आम्हालाही पर्याय नाही, असे म्हणत जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांची उमेदवारीच घोषित केली. अजित पवार आत्तापर्यंत 1 लाखांपेक्षा अधिक मतं घेऊन निवडूण आले आहेत, त्यांना उमेदवारी नाही दिली तर बारामतीकर घरातून बाहेर काढूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरवतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे अजित पवार बारामती मतदारसंघातील राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार असणारे हे सिद्ध झालं आहे.