Join us  

Ajit Pawar: थेट चॅलेंज... "मोदींचा फोटो न लावता निवडून येऊन दाखवा, आहे का धमक?"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 2:42 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा १७ सप्टेंबर रोजी देशभरात वाढदिवस साजरा करण्यात येतो.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आठव्या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रसेचे ज्येष्ठ नेते अजित पवार नाराज असल्याचं बोललं जात होतं. कारण, कार्यक्रम सुरू असतानाच अजित पवार हे व्यासपीठावरुन तडकाफडकी निघून गेले. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच स्वत: अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं. मी व्यासपीठावरुन नाराज होऊन निघून गेलो नव्हतो, तर वॉशरूमसाठी गेलो होतो, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. याच पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारच्या सेवा पंधरवडा निर्णयावरुनही भाष्य केलं. तसेच, भाजप नेत्यांना चॅलेंजही दिलं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा १७ सप्टेंबर रोजी देशभरात वाढदिवस साजरा करण्यात येतो. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सराकारने मोदींच्या वाढदिवसाचेनिमित्त साधत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा कालावधी सेवा पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यासंदर्भात अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना, प्रत्येक पक्ष आपल्या वरिष्ठ नेत्याच्या वाढदिवसांनिमित्त काही उपक्रम राबवत असतो. आम्हीही शरद पवारांच्या जन्मदिनी विधायक उपक्रम घेतो असे म्हणत त्या निर्णयाचं एकप्रकारे समर्थन केलं. मात्र, भाजपचा स्टार चेहरा हा मोदींचा आहे, मोदी हे स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे, मोदींच्या चेहऱ्याशिवाय भाजपचं राजकारणच होत नाही. मोदींचा फोटो न लावता भाजप नेत्यांनी निवडून येऊन दाखवावं, आहे का धकम? असं चॅलेंजच अजित पवारांनी दिलं. 

नाराजीबद्दल काय म्हणाले अजित पवार

दिल्लीत राष्ट्रवादीचं २ दिवसीय अधिवेशन पार पडलं. अधिवेशनात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रीय नेत्यांनी पक्षाची धोरणे आणि कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन केले. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलं. राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय नेत्यांनी मार्गदर्शन केले. मी राष्ट्रीय पातळीवर जास्त भाष्य करत नाही, असं अजित पवार म्हणाले. मला बोलण्याची संधी दिली परंतु वेळेअभावी बोलता आले नाही. केवळ मी नाही तर सुनिल तटकरे, वंदना चव्हाण आणि ५-६ जणांना भाषण करता आले नाही. शरद पवारांचे ३ वाजता समारोपाचं भाषण सुरू होणार होते. नाराजीच्या बातम्यांना काहीही अर्थ नाही अस सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजीच्या बातमीवर खुलासा केला आहे.  

टॅग्स :अजित पवारनरेंद्र मोदीभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस