मुंबई/बीड - मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच राज्याचे मंत्री आणि परळीचे भूमिपुत्र आमदार धनंजय मुंडेबीड जिल्ह्यात पोहोचले. नगरहून बीड-परळीकडे जात असताना मंत्रीधनंजय मुंडे यांचे जामखेड शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. तर, बीडमध्येही त्यांच्या स्वागताला जेसीबी आणि ट्रॅक्टर तयार होते. दरम्यान राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी फलक हातात घेऊन धनंजय मुंडे यांच्या राजकीय भूमिकेचा निषेधही केला. मात्र, मुंडेंनी परळीतील आपल्या भाषणात पहिल्यांदा विधानसभा दाखवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते अजित पवार होते, असा गौप्यस्फोट केला.
बीड जिल्हा अनेक वर्षांपासून मागासलेला आहे. तो विकसित करण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे. जिल्ह्याची मागासलेपणाची ओळख पुसून टाकण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे म्हणत बीड जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि कायम राहील, असा विश्वास कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. युतीच्या सरकारमध्ये मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते गुरुवारी पहिल्यांदाच जिल्ह्यात आले. यावेळी मोठ्या क्रेनने हार घालून व जेसीबीने फुले उधळत, ढोल-ताशा आणि फटाक्यांची आतषबाजी करत मुंडे यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
धनंजय मुंडेंनी अजित पवार यांच्यासमवेत सत्तेत जाऊन मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे, शरद पवार यांना सोडल्याने राष्ट्रवादीची काही मंडळी त्यांच्यावर नाराजही झाली आहे. राष्ट्रवादीतील नाराजांना उद्देशून आणि आपण अजित पवारांसमवेत का गेलो, हे सांगताना धनंजय मुंडेंनी जुनी आठवण सांगितली. ज्यावेळी ते पहिल्यांदा विधानपरिषदेवर गेले, तेव्हा विजयासाठी त्यांना दोन मते कमी पडत होती. मात्र, अजित पवारांनी विरोधी पक्षाकडून उमेदवारी असतानाही धनंजय मुंडेंना दोन मतं मिळवून दिली. त्यामुळेच, आपण विधानपरिषदेत पोहोचला. विधानसभेत जाण्याची ताकद असतानाही आपल्याला विधानपरिषदेत जावं लागलं, अशी खंतही मुंडेंनी बोलून दाखवली. तसेच, ज्यांनी साथ दिली, त्यांचे उपकार विसरायचे नसतात, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, धनंजय मुंडेंच्या स्वागतासाठी अहमदनगरच्या सीमेपासून ते परळी मतदारसंघापर्यंत तयारी केली होती. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. परंतु, या स्वागतासाठी राष्ट्रवादीचेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. युतीचे मंत्री असतानाही भाजप आणि शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची कोठेही उपस्थिती दिसून आली नाही.