मुंबईः राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा फोन हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई राष्ट्रवादीचे काँग्रेसचे उपाध्यक्ष नरेंद्र राणे यांना रविवारी सकाळी अजित पवार यांच्या नंबरवरून फोन आला, त्या फोनवरून एक व्यक्ती बोलत होती. त्या कुणाल नावाच्या व्यक्तीनं फोनवरून नरेंद्र राणे यांच्याकडून मोठ्या रकमेची मागणी केली. तुम्ही अमुक एका खात्यावर एवढी रक्कम लवकरात लवकर भरा, असा निरोपही त्या अज्ञात व्यक्तीनं दिला.नरेंद्र राणे यांच्यासाठी हा प्रकार संशयास्पद असल्यानं त्यांनी लागलीच अजित पवारांच्या स्वीय सहाय्यकाला फोन लावला. त्यावेळी अजित पवार पुण्यात होते. राणे यांनी अर्ध्या तासानं अजित पवारांना फोन लावला, तेव्हा फोनवरून लवकरच पैसे खात्यात जमा करतो, असं त्यांनी सांगितलं. अजित पवारांना ते काय म्हणतायत ते सुरुवातीला समजलंच नाही.त्यानंतर अजित पवारांनी सांगितलं की, मी तुम्हाला फोन केलेला नाही, माझा फोन माझ्याकडेच आहे. कोणत्या पैशांसदर्भात तुम्ही बोलत आहात, असं प्रश्नच अजित पवारांनी उपस्थित केला. त्यानंतर अजित पवारांचा फोन हॅक झाल्याचं समजलं. नरेंद्र राणे यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइममध्ये याबाबत तक्रार दिली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
अजित पवारांचा फोन हॅक; 'त्या' अज्ञाताकडून गंडा घालण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 11:11 AM