Join us  

चंद्रकांत पाटील बोलले ते खरे, माझं त्याला अनुमोदन; अजित पवारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 2:21 PM

भाजपचा तो केविलवाणा प्रयत्न आहे. शरद पवारांचे भाषण नीट ऐका. एका कवीचा दाखला त्यांनी दिला आहे असं अजितदादांनी म्हटलं आहे.

मुंबई - शरद पवार हे एकटे राष्ट्रवादी चालवतात असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला आहे. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या लोकांचा करिष्मा आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील बोलले ते खरे आहे. त्यांच्या बोलण्याला माझे अनुमोदन आहे असा चिमटा अजित पवार यांनी काढला आहे.

अजित पवार म्हणाले की, बहुतेक ठिकाणी तीच परिस्थिती असते. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे चालवत होते. तर भाजपामध्ये नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आला म्हणून भाजपच्या बोलणार्‍या लोकांना संधी मिळाली आणि आम्हाला आमच्या साहेबांमुळे संधी मिळाली. त्यामुळे चंद्रकांत पाटील बोलले ते खरे आहे, माझं त्यांना अनुमोदन आहे असं त्यांनी सांगितले.

भाजपाचा केविळवाणा प्रयत्न

शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढल्याचा आरोप करत भाजपाने पवारांची व्हिडीओ क्लीप ट्विट केली. त्यावर अजित पवार म्हणाले की, भाजपचा तो केविलवाणा प्रयत्न आहे. शरद पवारांचे भाषण नीट ऐका. एका कवीचा दाखला त्यांनी दिला आहे. पण ते न दाखवता वेगळंच दाखवलं आहे असं अजितदादांनी सांगितले.

नाना पटोलेंचं विधान हास्यास्पद

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेचाही अजित पवारांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, नाना पटोले यांचे स्टेटमेंट चुकीचे आहे. ते कुठुन आले आहेत ते सर्वांना माहीत आहे. त्यामुळे भाजपाने बोलावं का नाना पटोले यांनी पाठीत खंजीर खुपसला. हेडलाईन बनण्यासाठी ते बोलले असावेत. जबाबदार नेत्याने वक्तव्य करताना वेडेवाकडे परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी असं त्यांनी सुनावलं आहे. यावेळी आमचेही काही पदाधिकारी त्यांनी घेतले आहेत. १५ वर्षे कॉंग्रेस व राष्ट्रवादी या दोघांनी सरकार चालवले आहे. त्यावेळी कार्यकर्ते घेत होतो. इतर पक्षात जाऊन त्यांची ताकद वाढण्यापेक्षा एकमेकांच्या पक्षात राहतील हे पाहिले पाहिजे. आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही किंवा तलवार खुपसत नाही आणि असे कधीही बोलत नाही असंही अजित पवार म्हणाले.

टॅग्स :अजित पवारचंद्रकांत पाटीलशरद पवार