ठाकरे सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आर्थिक व्यवहार, उलाढाल आश्चर्य उत्पन्न करणारी आहे. तसेच पवारांचे मित्र, बिल्डरांकडून अजित पवार आणि त्यांच्या परिवाराच्या सदस्यांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांची (शंभरहून अधिक) अपारदर्शक नामी आणि बेनामी आवक असल्याची माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.मोहन पवार हे जरंडेश्वर साखर कारखान्याचे एक मालक आहेत. पवार परिवाराचे जावई आणि अन्य सदस्यांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांची ट्रान्सफर झाल्याची खळबळजनक माहिती सोमय्या यांनी ट्विटरवर दिली आहे. अजित पवार (स्वत:), त्यांची पत्नी सुनेत्रा अजित पवार, मुलगा पार्थ अजित पवार, आई आशाताई अनंतराव पवार, बहीण विजया मोहन पाटील, जावई मोहन पाटील, बहीण नीता पाटील यांच्या बँक खात्यात ही बेनामी आवक आल्याचे व्यवहार आढळून आले आहेत. तसेच गेली १९ दिवस आयकर आणि आता ईडीचे धाडसत्र आणि शोध ऑपरेशन(सर्च) सुरु आहेत. १ हजार ५० कोटी रुपयांची बेनामी संपत्ती समोर आली आहे, त्याचबरोबर १८४ कोटी रुपयांची रोकड, दागिने (ज्वेलरी), आर्थिक व्यवहारांचे कागदपत्र इ. इन्कम टॅक्सच्या हाती लागले असल्याचे ट्विटद्वारे माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे जरंडेश्वर साखर कारखाना, दौंड साखर कारखाना, श्री. अंबालिका शुगर प्रा. लि. व अन्य कंपन्यांचे आर्थिक व्यवहार झाले असून अजित पवार परिवाराच्या, समूहाच्या विभिन्न कंपन्यांच्या बरोबर केलेली हेराफेरी समोर येत आहे.