मुंबई - मराठा आरक्षणासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. हजारो मराठा बांधवांच्या सोबत ते आज पाथर्डीत पोहोचले असून आता माघार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. सरकारला आम्ही 6 महिन्यांचा वेळ दिला होता, त्यामुळे आता मुंबईत 26 जानेवारीपासून उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंना सामंजस्याची भूमिका घेण्याचं आवाहन केलं होतं. आता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अप्रत्यक्षपणे नाव न घेता जारांगेंना टोला लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शनिवारी मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाची बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या दृष्टीने कामही सुरू झाले आहे. याच बैठकीचा दाखला देत अजित पवार यांनी जरांगे पाटलांना टोला लगावला. ''अशावेळेस हे आजच झालं पाहिजे, हे इतक्या वेळेलाच झालं पाहिजे, असाही हट्ट राज्यातील कुठल्याही नागरिकाने करता कामा नये,'' असे म्हणत अजित पवार यांनी नाव न घेता जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला.
''सोलापूरला स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलंय. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर सरकारने जी पाऊलं उचलायला पाहिजे होती, ती सरकारने उचलली आहेत. काही गोष्टींना विलंब लागतो, एखादी गोष्ट ही कायद्याच्या, नियमाच्या चौकटीत बसवायची असल्यानंतर त्यात अॅडव्होकेट जनरलशी चर्चा करावी लागते, तज्ज्ञ वकिलांशी चर्चा करावी लागते, सरकारी वकिल, निष्णात वकिलांशी चर्चा करावी लागते. मागील घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी त्याचाही अभ्यास करावा लागतो.
स्वत: मुख्यमंत्री शिंदे सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत आहेत, सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी चर्चाही केली आहे. काम गतीनं होण्यासाठीचा निधीही उपलब्ध करुन दिलेला आहे, जबाबदारीही ठरवून दिलेल्या आहेत. अशावेळेस हे आजच झालं पाहिजे, हे इतक्या वेळेलाच झालं पाहिजे, असाही हट्ट राज्यातील कुठल्याही नागरिकाने करता कामा नये, असे अजित पवार यांनी म्हटले. अजित पवार यांनी नाव न घेता एकप्रकारे जरांगे यांच्यावरच निशाणा साधला.
जरांगेंना मुख्यमंत्र्यांचही आवाहन
"मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे काम सुरू आहे. त्यांनी आंदोलन थांबवले पाहिजे, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सरकार राज्यभरात कुणबी नोंदी शोधत आहे, मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. मागावर्ग आयोग काम करत आहे, समाजाला याचा फायदा होत आहे. जस्टीस शिंदे समितीची लोक राज्यात काम करत आहे. दीड लाख लोक तीन शिफ्टमध्ये काम करत आहे. राज्य सरकार फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देईल, इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले जाईल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.