छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षक होते, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं होतं. अजित पवारांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसादही उमटत आहेत. भाजपने अजित पवारांविरोधात आंदोलन केलं, तसंच त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. मात्र, आपण आपल्या मततावर ठाम असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं. तसेच, यावरुन आमदार नितेश राणेंनी केलेल्या टिकेसंदर्भात प्रश्न विचारला असता, त्यांनी टिल्ल्या म्हणत राणेंची खिल्ली उडवली होती. आता, नितेश राणेंनी अजित पवारांच्या टिकेवर पलटवार केला आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनी संभाजी महाराजांच्या मुद्द्यावरून अजित पवार, शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य केलं होतं. नितेश राणे यांनी एक पत्र ट्वीट केलं, यात त्यांनी औरंगजेबाने तोडलेल्या मंदिरांची यादी दिली. तर, 'काकाप्रमाणे पुतण्यांही हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर‘ नाहीत असे घोषीत करतो', असं नितेश राणे या पत्रात म्हटले होते. नितेश राणेंच्या याच टिकेवरुन अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी, अजित पवारांनी नितेश राणेंची खिल्ली उडवली होती. त्यानंतर, आता नितेश राणेंनी संताप व्यक्त केला आहे.
नितेश राणेंनी ट्विट करुन अजित पवारांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलंय. ''लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली व हे सिद्ध झाले की यांना ‘औरंग्यावरची‘ टिका सहन होत नाही म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही'', असा पलटवार नितेश राणेंनी केला आहे. त्यामुळे, आता राणे विरुद्ध पवार हा वैयक्तीक वाद निर्माण झाला आहे.
काय म्हणाले होते अजित पवार
'टिल्ल्या लोकांच्या बोलण्याला मी महत्त्व देत नाही, त्याची उंची किती तो बोलतो किती?', असा सवाल अजित पवारांनी विचारला. तसेच, मी असल्यांच्या टीकेला उत्तर देत नाही, त्यांना माझे प्रवक्तेच उत्तर देतील, असेही अजित पवार यांनी म्हटले होते.