दादांच्या पुण्याला, अध्यक्षांच्या साकोलीला अन् आदित्यच्या वरळीला झुकते माप!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 06:04 AM2020-03-07T06:04:54+5:302020-03-07T06:05:09+5:30
नाशिक, औरंगाबाद, हैदराबाद, बेंगळूरू व मुंबई शहरातून येणारी वाहतूक पुणे शहराबाहेर वळविण्यासाठी १७० किमी लांबीचा रिंगरोड उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
यदु जोशी
मुंबई : ‘गेल्या पाच वर्षांत जेवढा निधी पुणे मेट्रोसाठी देण्यात आला त्यापेक्षा जास्त निधी यंदा एका वर्षात आपले सरकार देईल, अशी घोषणा करीत वित्त मंत्री अजित पवार यांनी त्यांचे पुणेप्रेम व्यक्त केले. या शिवाय नाशिक, औरंगाबाद, हैदराबाद, बेंगळूरू व मुंबई शहरातून येणारी वाहतूक पुणे शहराबाहेर वळविण्यासाठी १७० किमी लांबीचा रिंगरोड उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
बालेवाडी; पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येणार आहे. इतर काही शहरांबरोबरच पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. साकोली हा विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचा मतदारसंघ. साकोलीमध्ये कृषी महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. तसेच, साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयाचे १०० खाटांच्या रुग्णालयामध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे असलेल्या पर्यटन व पर्यावरण खात्याची विशेष काळजी अजितदादांनी घेतल्याचे दिसले. वरळी या आदित्य यांच्या मतदारसंघात एक हजार कोटी रुपये खर्चून जागतिक पर्यटन केंद्र उभारले जाणार आहेच त्या शिवाय, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागासाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलवर लिटरमागे जो एक रुपया ग्रीन सेस लावण्यात आला आहे त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही हिस्सा आदित्य यांच्याकडील पर्यावरण विभागाला मिळेल.
>पुणे मेट्रोचा
होणार विस्तार
पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो अंतर्गत माण-हिंजेवाडी ते शिवाजीनगर या मार्गिकेव्यतिरिक्त शिवाजीनगर ते शेवाळेवाडी व माण ते पिरंगुट या दोन नवीन मार्गिका सुरू करण्यात येतील.
वनाज ते रामवाडी विस्तारीकरण करून ते चांदणी चौक व रामवाडी ते वाघोली तसेच पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकांची लांबी वाढविली जाईल. स्वारगेट ते कात्रज व पिंपरी-चिंचवड ते निगडी असे विस्तारीकरण केले जाईल.
>प्रबोधनकार अन् शेवाळकर
यांचे अचलपूरशी ऋणानुबंध
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आजोबा आणि थोर विचारवंत प्रबोधनकार ठाकरे आणि सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.राम शेवाळकर यांच्याशी संबंधित अचलपूर शहराच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.
अचलपूर-परतवाडा हे अमरावती जिल्ह्यातील जुळे शहर आहे. प्रबोधनकारांच्या पत्नी म्हणजे बाळासाहेबांच्या आई या परतवाड्याच्या होत्या. स्वत: प्रबोधनकारदेखील काही वर्षे परतवाड्याला राहिले, असे मूळ परतवाड्याच्या असलेल्या नीलिमा हारोडे यांनी सांगितले.
>बेरोजगारांसाठी महाराष्ट्र शिकाऊ योजनाआर्थिक मंदीच्या सावटाखाली बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढत असताना राज्यातील युवक-युवतींना रोजगारक्षम करण्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण झालेल्या युवक-युवतींकरिता ‘महाराष्ट्र शिकाऊ योजना’ राबविण्यात येणार आहे. ही योजना १५ आॅगस्ट २0२0 पासून सुरू करण्यात येईल. या योजनेमुळे शिकाऊ उमेदवार भरतीसाठी आस्थापनांना प्रोत्साहन मिळून ५ वर्षांत १0 लाख सुशिक्षित बेरोजगार तरुण प्रशिक्षत होतील व त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी ही योजना असेल. ही योजना २१ ते २८ वयोगटांतील सुशिक्षित बेरोजगारांसाठी लागू करण्यात येईल.
यासाठी दरमहा प्रति शिकाऊ उमेदवारास देय विद्यावेतनाच्या ७५ टक्के किंवा ५ हजार रुपये यापैकी कमी असलेली रक्कम खाजगी आस्थापनांना दिली जाईल. प्रती उमेदवार ६0 हजार रुपये इतका वार्षिक खर्च करण्यात येईल. या प्रोत्साहन योजनेत राज्य शासकीय-निमशासकीय आस्थापनांसाठी शासनाकडून १00 टक्के विद्यावेतन देण्यात येईल.
शासकीय-निमशासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी कायदा १९६१ मधील तरतुदीनुसार पारंपरिक व नवीन उद्योग क्षेत्रांमधील उमेदवारांना ठरावीक कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येईल. या योजनेच्या सुलभ व प्रभावी पारदर्शक अंमलबजावणीसाठी नवीन संकेतस्थळ तयार करण्यात येईल. पाच वर्षांकरिता ६ हजार कोटी या योजनेवर अंदाजे खर्च येईल.
>महिलांसाठी
पोलीस ठाणे
प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात एक महिला पोलीस ठाणे स्थापन करण्यात येणार आहे. या पोलीस ठाण्यात सर्व अधिकारी, कर्मचारी महिलाच असतील. पोलीस ठाण्यात जिल्ह्यातील कोणत्याही महिलेस तक्रार करता येईल. महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारींसंबंधी तपास करण्यासाठी विशेष तपास पथक निर्माण करण्यात येणार आहे.
महिलांवरील अत्याचारांच्या खटल्यात न्यायालयात शासनाची बाजू मांडण्यासाठी महिला शासकीय अभियोक्त्याची नियुक्ती करण्यात येईल. तसेच महिलांवर अत्याचार घडू नये आणि घडलेच तर गुन्हेगारांवर वचक राहावा, यासाठी कडक कायदा करण्यात येईल, असेही अजित पवार म्हणाले.
राज्यातील ग्रामीण भागातील महिला व किशोरवयीन मुलींमध्ये वैयक्तिक स्वच्छतेसंबंधी जाणीव-जागृती निर्माण करण्याकरिता सर्व माध्यमिक शाळांमधील किशोरवयीन मुलींना माफक दरात दर्जेदार सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यात येतील. वापरलेल्या सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व माध्यमिक शाळांमध्ये यंत्रे बसवण्याचे नियोजन करण्यात येत असून २0२0-२१ या आर्थिक वर्षात यासाठी १५0 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील.
>माझे आजोबा कीर्तनकेसरी भाऊसाहेब शेवाळकर, वडील राम शेवाळकर यांचे अचलपूरशी घट्ट नाते राहिले. ते आमच्या कुटुंबाने आजही जपले आहे. वित्त मंत्र्यांनी आज अचलपूरच्या विकासाचा आराखडा करणार ही घोषणा केली याचा आनंद वाटतो. - आशुतोष शेवाळकर
>या रिंगरोडसाठी १५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यंदा हे भूसंपादन करून येत्या चार वर्षांत राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हा रिंगरोड पूर्ण केला जाईल. - अजित पवार