Join us

अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 10:56 AM

मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदावर बढती देण्यात आली आहे.

मुंबई - मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदावर बढती देण्यात आली आहे. राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा अडसर दूर झाला. पुढील 3 दिवसांत अजोय मेहता पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. येत्या सप्टेंबरमध्ये अजोय मेहता निवृत्त होणार आहेत. 

अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी बढती झाल्याने मुंबई महापालिकेच्या रिक्त झालेल्या आयुक्तपदासाठी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तर सध्या मुख्य सचिवपदी असलेले युपीएस मदान यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याची शक्यता आहे. युपीएस मदान यांची या वर्षीच्या मार्च महिन्यात मुख्य सचिवपदी नियुक्ती केली होती. येत्या ऑक्टोबर महिन्यात मदान निवृत्त होणार आहेत मात्र तत्पूर्वीच मदान यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याचं बोललं जातंय. युपीएस मदान यांना राज्य सरकारकडून महामंडळ अथवा आयोगाच्या संचालकपदी नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. 

अजोय मेहता यांनी 2015 मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडून मुंबई महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता. तब्बल 4 वर्ष त्यांनी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे सांभाळली. 27 एप्रिल 2019 रोजी अजोय मेहता यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची 4 वर्ष पूर्ण केली. मुंबई महापालिकेच्या कारभारात सर्वाधिक काळ पदभार स्वीकारणारे अजोय मेहता हे पहिले आयुक्त आहे. यापूर्वी सदाशिव तिनईकर यांनी 1986 ते 1990 मध्ये मुंबई महापालिकेचे आयुक्त होते. त्यांनी 3 वर्षे 9 महिने आणि 8 दिवस इतका कालावधी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावर पूर्ण केला होता. अजोय मेहता यांनी सदाशिव तिनईकरांनंतर हा मान पटकावला. अजोय मेहता यांनी महापालिकेच्या कारभारात शिस्त आणली. त्यांच्या कडक शिस्तीने महापालिकेचा कारभार सुधारल्याचं बोललं जातं. तसेच शिवसेनेच्या कारभारावर वचक ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अजोय मेहता यांचा महापालिका आयुक्तपदावर नियुक्ती केली होती असा आरोप नेहमी केला जातो. 

टॅग्स :राज्य सरकारमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीसभारतीय निवडणूक आयोगअजोय मेहता