अजोय मेहता यांनी नरीमन पॉइंट येथे खरेदी केला ५.३ कोटींचा फ्लॅट
By मोरेश्वर येरम | Published: November 23, 2020 12:27 PM2020-11-23T12:27:26+5:302020-11-23T12:30:55+5:30
मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त आणि माजी मुख्य सचिव सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार आहेत.
मुंबई
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांनी मुंबईतील प्रतिष्ठीत नरीमन पॉइंट परिसरात ५.३ कोटी रुपये किमतीचा फ्लॅट खरेदी केला आहे. यासंबंधिचे वृत्त 'मुंबई मिरर' दैनिकात प्रसिद्ध झाले आहे.
मंत्रालयाजवळील जनरल जग्गनाथ भोसले मार्ग येथील समता कोऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये ५ व्या मजल्यावर मेहता यांनी फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटचे चटई क्षेत्र (कार्पेट एरिआ) तब्बल १,०७६ स्वेअर फूट इतके आहे. फ्लॅटसोबतच या इमारतीमध्ये मेहता यांना दोन कार पार्किंग स्पॉट मिळाले आहेत.
मेहता यांनी स्वत: या वृत्ताचे समर्थन केले आहे. सर्व व्यवहार बाजारमुल्यानुसार झाले असून याबाबतचे सर्व कागदपत्रं सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत, असं मेहता यांनी स्पष्ट केलं आहे. मेहता यांनी खरेदी केलेल्या फ्लॅटचा बाजारभाव ५.३ कोटी इतका आहे.
मेहता यांनी या व्यवहारात २.७६ कोटी रुपये नेटबँकिंग आरटीजीएस केले आहेत. २.५ कोटी रुपये हे आगाऊ धनादेशाने दिले आहेत. तर ३.९७ लाख रुपयांचा टॅक्स भरला आहे. उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार, फ्लॅटची १०.६८ लाख इतकी स्टॅम्प ड्युटी विक्रेत्याने भरली आहे. अनामित्रा प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हा फ्लॅट २००९ साली आशिष मनोहर यांच्याकडून ४ कोटी रुपयांना विकत घेतला होता.
अजोय मेहता हे १९८४ च्या बॅचचे आयपीएल अधिकारी असून मे २०१९ मध्ये त्यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली होती. याआधी त्यांनी चार वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळली होती. सप्टेंबर २०१९ साली ते निवृत्त होणार होते. परंतु विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना ६ महिन्यांची वाढीव मुदत देण्यात आली होती. त्यानंतर कोविड काळामुळे त्यांना पुन्हा एकदा ३ महिन्यांची वाढीव मुदत देण्यात आली आहे. ते ३० जून रोजी निवृत्त झाले. आता ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार म्हणून काम पाहात आहेत.