मुंबई - अवघ्या दोन वर्षांपूर्वी भारतात विमान व्यवसायास सुरुवात केलेल्या अकासा विमान कंपनीने आता आंतरराष्ट्रीय मार्गांवर देखील उड्डाण सुरू केले आहे. गुरुवारी कंपनीचे पहिले विमान मुंबईतून दोहा येथे रवाना झाले. या पाठोपाठ आता कंपनीला कुवेत, जेद्दा, रियाध येथे देखील विमान सेवेसाठी अनुमती मिळाली असून या मार्गांवर देखील लवकरच कंपनी आपली सेवा कार्यान्वित करणार आहे.
या आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमान सेवेचा फायदा केवळ मुंबईकरांनाच होणार नाही तर आजच्या घडीला दिल्ली, अहमदाबाद, गोवा, वाराणसी, लखनौ, बंगळुरू, कोची या प्रमुख शहरात कंपनीची देशांतर्गत सेवा आहे. कंपनीच्या या विमानांच्या माध्यमातून मुंबईत येत प्रवाशांना आंतरराष्ट्रीय प्रवास करता येईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. दरम्यान सध्या कंपनीच्या ताफ्यात २० पेक्षा जास्त विमाने असून देशांतर्गत बाजारात कंपनीची मार्केट हिस्सेदारी ४ टक्के इतकी आहे. तर कंपनीने आणखी नव्या विमानांच्या खरेदीची प्रक्रिया देखील सुरू केल्याची माहिती आहे.