मुंबई : कोरोना हे जागतिक पातळीवर आलेले महाभयानक संकट. या काळात अनेक लहानथोर माणसे आपल्या डोळ्यासमोरुन गमावली. अनेकांना इस्पितळाच्या चकरा माराव्या लागल्या. या काळात मानवतेचे, माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या अनेक घटना घडल्या. अशाच एका गरीब कुटुंबात असलेला शाळकरी मुलगा त्याची गेल्या चार वर्षांपासून ची फी भरली नाही म्हणून भवितव्य अंधारात जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतू बोरीवली( पूर्व) येथील कुलुपवाडीत कार्यरत असलेल्या अखिल रुक्मिणी नगर उत्कर्ष संच या संस्थेने तब्बल एकवीस हजार रुपये शालेय शुल्क भरले आणि या होतकरु हुशार मुलाच्या भविव्यात उद्भवू पाहणारा अंधार दूर केला. या संस्थेने शिवम संतोष धुमाडे या शाळकरी विद्यार्थ्याच्या जीवनातील अंध:कार दूर केला, या बद्दल या संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एका गरीब कुटुंबात वावरणारा कुमार शिवम संतोष धुमाडे हा बोरीवली पूर्व येथील सेंट जॉन इंग्लिश स्कूल मध्ये सातव्या इयत्तेत शिकतो. कोरोना मुळे संतोष आपली फी भरु शकला नाही. सुमारे एकवीस हजार रुपये एवढी रक्कम थकबाकीची झाली. त्याची आई रेखा संतोष धुमाडे ही लोकांकडे धुणी भांडी करीत असल्याने एवढी रक्कम भरणे त्यांना शक्य नव्हते. शाळेने धुमाडे कुटुंबाच्या मागे तगादा लावला. शिवमच्या शैक्षणिक भवितव्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. शिवमच्या आईने बोरीवली पूर्व येथील सेवानिवृत्त पोस्ट अधिकारी सुनील पांगे यांच्या कानावर ही गोष्ट घातली. योगायोगाने सुनील पांगे हे बोरीवली पूर्व येथील कुलुपवाडीत कार्यरत असलेल्या अखिल रुक्मिणी नगर उत्कर्ष संघाचे क्रियाशील खजिनदार आहेत. त्यांनी संस्थेचे संस्थापक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्राम लाड यांना ही परिस्थिती समजावून सांगितली आणि आपल्याला या शिवमला सहकार्य करावे लागेल, असे सांगितले.
'एक पाऊल समाजसेवेकडे' या उद्देशाने लाड यांच्या मार्गदर्शनाखाली खजिनदार सुनील पांगे, पदाधिकारी राजू गिते, भरत धुवाळी, संतोष बांडागळे, मंगेश यादव, सुनील पोटले आदींनी सेंट जॉन इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका रीना संतोष यांची भेट घेतली आणि त्यांना ही संस्था शिवम संतोष धुमाडे याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे सांगून एकवीस हजार रुपयांचा एकरकमी रकमेचा धनादेश सुपूर्द केला.