Join us

'अक्षय, तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी', छत्रपती संभाजीराजेंच्या पोलिसांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 6:19 PM

अक्षय बोऱ्हाडे या तरुणाने फेसबुक लाईव्हद्वारे जुन्नर तालुक्यातील साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर याच्यावर मारहाणीचे आरोप केले आहेत

मुंबई - सोशल मीडियावर अक्षय बोऱ्हाडे नामक एका तरुणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये या तरुणाने दावा केला आहे की, शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेघर, निराधार लोकांची सेवा करत असल्याने जुन्नरमधील बड्या राजकीय नेत्याकडून आपणास मारहाण करण्यात आली. खुद्द भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी याप्रकरणी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. तर, छत्रपती संभाजीराजे यांनीही अक्षयला फोन करुन धीर दिलाय. घाबरू नकोस, मी तुझ्या पाठिशी असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलंय. 

अक्षय बोऱ्हाडे या तरुणाने फेसबुक लाईव्हद्वारे जुन्नर तालुक्यातील साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर याच्यावर मारहाणीचे आरोप केले आहेत. गेल्या ३ वर्षापासून मी छत्रपती शिवरायांच्या विचाराने समाजाची सेवा करत आहे. निराधार, गरीब लोकांना जेवण देण्याचं त्यांना न्याय देण्याचं काम केलं, कधीही स्वत:चा विचार केला नाही. माझं कुटुंबदेखील माझ्यासोबत काम करत आहे. काही राजकीय मंडळींनी मला त्यांच्या बंगल्यावर नेऊन मारहाण केली. मला बंदूक दाखवून त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, मोबाईल काढून घेतला. तसेच माझा व्हिडीओ काढून पैसे घेतल्याचं बतावणी करण्यात आली. पैशाच्या जोरावर मला मारहाण केली. मी केलेले आरोप खोटे असेल असं वाटत असेल तर चेअरमनच्या बंगल्यावरील सीसीटीव्ही चेक करा, त्याच्यापुढे जाणाऱ्या माणसांना मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. याप्रकरणी उदयनराजे भोसेले आणि छत्रपती संभाजीराजे यांनी अक्षयला आधार दिला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनीही फेसबुक पोस्ट लिहून, अक्षय तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे, असे म्हटलंय. तसेच, अक्षयला पोलीस संरक्षण देण्याच्या सूचनाही केल्याचं संभाजीराजेंनी सांगितलंय. 

अक्षय, तू घाबरू नकोस! तुझ्यासारख्या प्रामाणिक शिवभक्तांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे. छत्रपतींचा वंशज म्हणून माझं ते कर्तव्यच आहे. आत्ताच मी अक्षयशी बोललो. त्याला धीर दिला. आणि पुढेही सर्व ते सहकार्य करण्याचा शब्द दिला.

घरातील गरिबीची तमा न बाळगता समाजाची सेवा झोकून देऊन करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडे या मुलावर अत्याचार झाल्याची बातमी मनाला वेदना देऊन गेली. छत्रपती शिवाजी महाराज,, संभाजी महाराजांना आदर्श मानून त्याने कार्य सुरू ठेवले आहे. या मुलाच्या कार्याची दखल घेत, पुरंदर किल्ल्यावर शंभु जयंती ला माझ्या हस्ते सत्कारही करण्यात आला होता.

अश्या प्रामाणिक शिवभक्ताला एका सत्तांध व्यक्तीकडून मारहाण होते, त्यांनतर त्याला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी मिळते. हे अत्यंत चुकीचं आहे.

पोलीस प्रशासनाने या घटने कडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. संपूर्ण घटनेचा छडा लावून आरोपी ला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे, कुणा पक्षाचा, कुणा जातीचा, कारखानदाराचा किंवा मोठ्या घरचा म्हणून का मुलाहिजा ठेवावा?

अक्षय बोऱ्हाडे च्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांनी घ्यावी अशी सूचनाही करतो.

छत्रपती संभाजीराजे

दरम्यान, अक्षय बोऱ्हाडेंच्या अनुषंगाने मला अनेकांचे फोन आले. अक्षयच्या कामाचं मलाही कौतुकच आहे, पण अक्षयने आरोप केलेले सत्यशील शेरकर आणि मी, आम्ही दोघेही समाजकारणात येण्याअगोदरपासूनच चांगले मित्र आहोत. सत्यशील शेरकरांनादेखील मी जवळून ओळखतो. तरी, याप्रकरणात कोणावर अन्याय झाला असेल तर कोणालाही पाठिशी घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची सूचना संबंधित पोलीस खात्याला मी आधीच केली आहे, असे कोल्हे यांनी म्हटले. तसेच, अक्षय बोराडे यांनी समाजमाध्यमावर प्रसारीत केलेला व्हिडिओ ही नाण्याची एक बाजू असू शकते, हेही आपण समजून घेतलं पाहिजे, असेही कोल्हे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :संभाजी राजे छत्रपतीगुन्हेगारीपोलिसमुंबई बंदपुणे