मुंबई - अक्षय कुमार हा अस्सल हिंदुस्थानी आहे. त्याच्या कॅनडाच्या नागरिकत्वाचा विषय ही एक तांत्रिक बाब आहे. मात्र गेल्या काही वर्षांत अक्षयकुमारने शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी आपल्या कमाईतील मोठा वाटा दिला आहे. तरुणवर्गात देशभक्तीचा जोश निर्माण करण्यासाठी अक्षय गेली अनेक वर्षे अनेक उपक्रम राबवीत आहे. त्यामुळे हे वाद निरर्थक आहेत असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. सामना संपादकीयमधून आज शिवसेनेने अक्षय कुमारच्या नागरिकत्वाच्या वादावर भाष्य केलं आहे.
शिवसेनेने असं म्हटलंय की, पस्तीस वर्षांपूर्वी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी ‘आयएनएस विराट’ युद्धनौकेची खासगी पर्यटन टॅक्सी केल्याचे प्रकरण गाजते आहे. यावर काँग्रेसच्या मंडळींनी अक्षयकुमारलाही पंतप्रधान मोदी यांनी एका युद्धनौकेवर नेल्याचे पोरकट प्रकरण काढले. मात्र या दोन्ही प्रकरणांत जमीन-अस्मानचे अंतर आहे.
तसेच देशातील राजकारण्यांना लोकांच्या जीवनमरणाची खरोखरच चिंता आहे काय? ते नक्की कोणत्या जगात वावरत आहेत? देशातील लोकसभा निवडणुकीतील लढाई जवळजवळ अंतिम टप्प्यात आली आहे आणि प्रचाराच्या पातळीचा प्रश्न नेहमीप्रमाणे उपस्थित केला जात असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं.
माजी पंतप्रधान राजीव गांधींनी आयएनएस विराटचा वापर टॅक्सीसारखा केला, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानामुळे भाजपा-काँग्रेसमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे. राजीव गांधींनी सुट्टीसाठी आयएनएस विराटचा वापर केला, असा दावा करणाऱ्या मोदींना काँग्रेसच्या सोशल मीडिया विभाग सांभाळणाऱ्या दिव्या स्पंदना यांनी प्रत्युत्तर दिलं. अभिनेता अक्षय कुमारचे आयएनएस सुमित्रावरील फोटो ट्विट करत कॅनडाचा नागरिक असलेल्या व्यक्तीला पंतप्रधान मोदी आयएनएस सुमित्रावर घेऊन गेले होते. ते कसं काय चाललं, असा सवाल स्पंदना यांनी उपस्थित केला होता.
अक्षय कुमारकडे असलेल्या कॅनडाच्या नागरिकत्वावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. हाच संदर्भ देत दिव्या स्पंदना यांनी मोदींना लक्ष्य केलं होतं. स्पंदना यांनी त्यांच्या ट्विटमध्ये एका लेखाची लिंक दिली आहे. '2016 मध्ये विशाखापट्टणममध्ये इंटरनॅशनल फ्लिट रिव्ह्यूला (आयएफआर) अक्षय कुमार त्याच्या कुटुंबासह उपस्थित होता. इतकंच नव्हे, तर अक्षयनं नौदलाच्या अधिकारी आणि इतर पाहुण्यांसोबत सुमित्रा जहाज चालवलं,' अशी माहिती स्पंदना यांनी ट्विट केलेल्या लेखात आहे अशी माहिती स्पंदना यांनी दिली.