Join us

तिरंगा उलटा का पकडला होता ? अक्षय कुमारने दिलं स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 2:04 PM

महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यादरम्यान बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारला तिरंगा उलटा पकडल्याबद्दल टीकेला सामोरं जावं लागलं होतं

ठळक मुद्देतिरंगा उलटा पकडला असल्याने अक्षय कुमारला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतंआपली चूक लक्षात येताच अक्षय कुमारने माफी मागत फोटो डिलीट केला होता'जेव्हा मी तिरंगा उघडत होतो तेव्हा कोणीतरा मागून हा फोटो काढला होता'

मुंबई, दि. 28 - महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यादरम्यान बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारला तिरंगा उलटा पकडल्याबद्दल टीकेला सामोरं जावं लागलं होतं. लॉर्ड्स येथे भारत आणि इंग्लंड दरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात अक्षय कुमार खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होता. अक्षय कुमारने ट्विटरवर तिरंगा फडकावत असतानाचा एक फोटोही शेअर केला होता. मात्र या फोटोत त्याने तिरंगा उलटा पकडला असल्याने ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. आपली चूक लक्षात येताच अक्षय कुमारने माफी मागत फोटो डिलीट केला होता. 

आपला आगामी चित्रपट 'टॉयलेट - एक प्रेम कथा'च्या प्रमोशनमध्ये अक्षय कुमार सध्या व्यस्त असून यावेळी त्याला या फोटोबद्दल विचारण्यात आलं. अक्षयने स्पष्टीकरण देताना सांगितलं की, 'जेव्हा मी तिरंगा उघडत होतो तेव्हा कोणीतरा मागून हा फोटो काढला होता'. 

अक्षय कुमारने सांगितलं की, 'खरं सांगायचं तर त्यावेळी माझ्या हातात तिरंगा होता, आणि मी तो उघडत होतो. उघडताच तो उलटा होता, आणि मी त्याला सरळ करण्याचा प्रयत्न करत होतो. तितक्यात कोणीतरी पाठीमागून माझा फोटो काढला. तुम्ही टीव्हीवर पाहाल तर माझ्या हातात तिरंगा सरळ असल्याचं दिसेल. तरीही जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. याआधीही मी या गोष्टीसाठी माफी मागितली आहे'. 

गेल्या काही वर्षांपासून देशभक्ती आणि सामाजिक विषयावर आधारित चित्रपट करत असलेल्या अक्षय कुमारने सांगितलं की, 'मला कोणत्याही साच्यात अडकायचं नाही आहे. मला जे काम मिळत आहे ते मी करत आहे. जेव्हा मी इंडस्ट्रीत आलो तेव्हा लोक मला अॅक्शन हिरो बोलायचे, त्यानंतर मी कॉमेडी केली तर कॉमेडी हिरो बोलायला लागलो. मी निगेटिव्ह भूमिकाही केल्या आहेत. मला वेगवेगळ्या भूमिका करायच्या आहेत, आणि त्यासाठी मी प्रयत्न करत आहेत. मला फक्त सामाजिक विषयांशी संबंधित चित्रपट करत नाही आहे, गेल्यावर्षी 'हाऊसफूल्ल' चित्रपटही आला होता असं अक्षयने हसता हसता सांगितलं. 

'टॉयलेट - एक प्रेम कथा' लीक झाल्याच्या प्रश्नावर बोलताना अक्षय कुमारने सांगितलं की, 'मुंबई क्राईम ब्रांचने वेळेत कारवाई केल्याने पायरसी झाली नाही'.