मुंबई: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने मंगळवारी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८'च्या व्यासपीठावर आपल्या राजकारणातील प्रवेशाविषयी सूचक भाष्य केले. लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी या मुद्द्यावर अक्षयला बोलते केले. गेल्या काही वर्षांमधील तुझे चित्रपट पाहिल्यास त्यामध्ये एक ठोस सामाजिक संदेश होता. सामाजिक प्रश्न मांडण्यासाठी संसद आणि विधानसभा हेदेखील चांगले व्यासपीठ आहे. त्यामुळे एखाद्या पक्षाने तुला राज्यसभेच्या खासदारकीची ऑफर दिल्यास तू स्वीकारशील का, असा प्रश्न ऋषी दर्डा यांनी विचारला. तेव्हा व्यासपीठावर बसलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लगेचच होकार दर्शवला. त्यावर अक्षय कुमारने म्हटले की, राजकारणात आल्यानंतर त्यासाठी पूर्ण वेळ दिला पाहिजे, असे मला वाटते. मात्र, सध्या मला चित्रपटांमध्ये काम करायचे आहे. सध्याच्या घडीला मी 'रावडी राठोड-2' किंवा 'सिंग इज किंग' सारख्या व्यावसायिक चित्रपटांची निर्मिती करू शकतो. परंतु मला ठोस सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांची निर्मिती करायची आहे. त्यामुळे तुर्तास तरी राजकारणात जाण्याचा माझा कोणताही विचार नसल्याचे अक्षय कुमारने स्पष्ट केले. याशिवाय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कॅनेडियन नागरिकत्त्वाच्या मुद्द्यावरून केलेल्या टीकेसंदर्भातही अक्षयला प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अक्षयने म्हटले की, मला बिलकूल वाईट वाटले नसल्याचे सांगितले. मी राज ठाकरेंची टीका फारशी मनाला लावून घेतली नाही. कारण आपल्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीत प्रत्येकालाच हवे ते बोलण्याचा हक्क आहे, असे अक्षयने सांगितले.
राजकारणातील प्रवेशाबाबत अक्षय कुमारने केले सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 2:03 PM