मुंबई : केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षणात या वेळेस रँकिंग घसरू नये यासाठी महापालिका प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मुंबईकरांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यासाठी महापालिकेने बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार यास पाचारण केले आहे. अक्षयनेही यासाठी पुढाकार घेतल्याने लवकरच त्याचा लघुपट सर्व सार्वजनिक ठिकाणी प्रसारित होणार आहे.केंद्र सरकारने २०१४ मध्ये स्वच्छता अभियान जाहीर केल्यानंतर संपूर्ण देशभर ही मोहीम सुरू आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीला दीडशे वर्षे २०१९ मध्ये पूर्ण होत आहेत. त्यापूर्वी भारत देश स्वच्छ व हागणदारीमुक्त करण्याचा केंद्राचा निर्धार आहे. मात्र या मोहिमेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई शहर मागे पडले आहे. स्वच्छता सर्वेक्षणात २०१५ मध्ये १९ व्या क्रमांकावर असलेले मुंबई शहर गेल्या वर्षी २९ व्या क्रमांकापर्यंत घसरले. केलेले काम केंद्र सरकार व नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याने ही घसरण होत असल्याचा निष्कर्ष पालिकेने काढला. यावर मात करण्यासाठी मुंबई महापालिकेने स्वच्छतेचे अॅप मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोहीम राबवली.गेल्या महिन्याभरात ६६ हजार मुंबईकरांनी स्वच्छतेचे अॅप डाऊनलोड केले आहे. या अॅपच्या माध्यमातून अस्वच्छ परिसराच्या ४६ हजार तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत.केंद्र सरकारमार्फत होणारे स्वच्छता सर्वेक्षण २०१८ सुरू झाले असून ते १० मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत केंद्र सरकारचे पथक देशातील सर्व शहरांमधील नागरिकांच्या प्रतिसादातून तेथील स्वच्छतेचा दर्जा निश्चित करणार आहेत. त्यामुळे नागरिकांना स्वच्छतेचे धडे देण्यासाठी पालिका आयुक्त अजय मेहता यांनी अभिनेता अक्षय कुमारला पुढाकार घेण्याची विनंती पत्राद्वारे केली होती.त्यानुसार अक्षय कुमार संदेश देत असलेल्या लघुपटावर काम सुरू असून तो लवकरच चित्रपटगृह व सर्व सार्वजनिक ठिकाणी दाखविण्यात येणार आहे.मुंबईकर मागेगेल्या वर्षी नवी मुंबईतील १८ हजार ६७४ युजर्सनी स्वच्छता मोबाइल अॅप वापरले. त्यापाठोपाठ पुण्यात ११ हजार ६७४ जणांनी हे अॅप वापरले. मुंबईत मात्र ही संख्या केवळ नऊ हजार २५२ इतकीच होती. सोशल प्रचारामुळे हा आकडा आता ६६ हजारवर पोहोचला असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
अक्षय कुमार देणार मुंबईकरांना स्वच्छतेचे धडे; लघुपट सार्वजनिक ठिकाणी प्रसारित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 2:59 AM