अक्षय कुमार कॅनडाचा नागरिक; त्याला देशातील प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही- जितेंद्र आव्हाड
By मुकेश चव्हाण | Published: February 18, 2021 04:44 PM2021-02-18T16:44:42+5:302021-02-18T16:44:58+5:30
अमिताभ बच्चन काही देशाचा आदर्श नाहीत, अशी टीका मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
मुंबई: काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन टिवटिव करणारे बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार आता गप्प का? असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमिताभ, अक्षय यांना महाराष्ट्रात शुटिंग करू देणार नाही, असा थेट इशारा दिला आहे. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत केलेल्या जुन्या ट्विट्सचा संदर्भ देत नाना पटोले यांनी दोन्ही कलाकारांवर निशाणा साधला आहे.
काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन सारखी टिवटिव करणाऱ्या अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना आता पेट्रोलची दरवाढ दिसत नाही का? त्यावेळी ६० रुपये पेट्रोलची किंमत असताना हे सेलिब्रिटी शंख करत होते. मग आता पेट्रोलच्या दरानं शंभरी गाठलेली असताना सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. अशावेळी हे सेलिब्रिटी शांत का? केंद्रात मोदींचं सरकार आहे म्हणून हे चिडीचूप झालेत का?" अशा प्रश्नांची सरबत्ती करत नाना पटोले यांनी अमिताभ आणि अक्षय यांच्यावर टीका केली.
महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची आज पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे परवड होत असताना अमिताभ व अक्षय यांची चुप्पी योग्य नाही. त्यांना महाराष्ट्रात शूटिंग करण्याचा अधिकार नाही. त्यांचं जिथं कुठं शूटिंग सुरू असेल तर बंद पाडण्याची व्यवस्था आम्ही करू, असा थेट इशाराच नाना पटोले यांनी दिला आहे.
युपीएच्या काळात इंधनाचे दर ७० रु झाल्यावर टीव टीव करणारे @SrBachchan, @akshaykumar आज पेट्रोलचे दर १०० रु. झाल्यावरही गप्प का आहेत? सर्वसामान्य जनतेची लूट करणाऱ्या मोदी सरकारविरोधात गप्प असणाऱ्या या सेलिब्रिटींच्या पिक्चरचे शुटींग महाराष्ट्रात होऊ देणार नाही.. pic.twitter.com/PEmirXQIe6
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 18, 2021
नाना पटोले यांच्या या भूमिकेचं राष्ट्रवादी काँग्रेसने देखील स्वागत केलं आहे. देशातील प्रश्नावर बोलण्याचा अक्षय कुमारला अधिकार नाही. तो कॅनडाचा नागरिक आहे. तसेच अमिताभ बच्चन काही देशाचा आदर्श नाहीत, अशी टीका मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्याचप्रमाणे अमिताभ बच्चन यांना मेमरी लॉस झाला आहे का, असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. या लोकांनी राजकारणात हात घालायला नको, असं म्हणत अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना लाचारी करावी लागते हे दुर्दैवं असल्याचं देखील जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे.
काँग्रेस अध्यक्षपदावर बसल्यानंतर नाना पटोलेंना विस्मरण-
हे हास्यास्पद आहे. काँग्रेस अध्यक्षपदावर बसल्यानंतर नाना पटोलेंना विस्मरण झालं आहे. काँग्रेसचा आत्मा हुकुमशाहीचा आहे, चेहरा मात्र लोकशाहीचा आहे, असं भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.