आपण समाजाचे पहारेकरी व्हायला हवं, अक्षय कुमारचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2017 01:16 PM2017-07-27T13:16:40+5:302017-07-27T13:21:05+5:30
मानवी तस्करीसारखा घृणास्पद गुन्हा पाहिला की या समाजाला नक्की झालंय तरी काय असा प्रश्न पडतो. मानवी तस्करीमुळे बळी पडणा-या लोकांना वाचवण्यासाठी आपण समाजाचे पहारेकरी म्हणून काम केले पाहिजे
मुंबई, दि. 27 - मानवी तस्करीसारखा घृणास्पद गुन्हा पाहिला की या समाजाला नक्की झालंय तरी काय असा प्रश्न पडतो. मानवी तस्करीमुळे बळी पडणा-या लोकांना वाचवण्यासाठी आपण समाजाचे पहारेकरी म्हणून काम केले पाहिजे, असं आवाहन अभिनेता अक्षय कुमारने केलं आहे. राज्य महिला आयोग आणि इंटरनॅशनल जस्टीस मिशन यांच्यातर्फे आयोजित केलेल्या महिला तस्करीविरोधातील कार्यक्रमात अक्षय कुमार बोलत होता. मुंबईमध्ये आयोजित केलेल्या परिषदेसाठी राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, अभिनेता अक्षय कुमार, सेकंड लेडी ऑफ घाना हाजिया सामिरा बावुमिया, इंटरनॅशनल जस्टीस मिशनचे अध्यक्ष गॅरी होगेन, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर उपस्थित होत्या.
ही तस्करी आपल्या समाजाला गिळत चालली आहे. आपण सर्वांनी बळी पडणा-या लोकांना वाचवण्यासाठी समाजाचे पहारेकरी म्हणून आपण काम केले पाहिजे. मी स्वत: दोन वर्षांमध्ये 10 हजार महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत. त्यामुळे मुलींना त्यांच्या हक्काची जाणिव करुन देणे आणि स्वसंरक्षण हे महिला तस्करीविरोधात लढण्यास मदत करतील असे मला वाटते.
यावेळी बोलताना, महिला आणि मुलांची तस्करी हा मानवतेविरोधातीलच गुन्हा मानला पाहिजे, एखाद्या व्यक्तीच्या आत्मप्रतिष्ठेशी खेळणे हा सर्वात गंभीर गुन्हा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळेस बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मानवी तस्करी नावाच्या राक्षसी गुन्ह्याविरोधात आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. मानवी तस्करी हा जगातील दोन नंबरचा ब्लॅक ट्रेड म्हणून ओळखला जातो, हे थांबवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. महिलांची तस्करी म्हणजे त्यांच्या आत्मसन्मानाशी केलेला खेळच म्हणावा लागेल, एखाद्या व्यक्तीच्या हत्येपेक्षाही हीन दर्जाचा असा हा गुन्हा आहे. एकेकाळी मानवी तस्करीचा धोका केवळ गरीब वर्गापर्यंत मर्यादित होता, मात्र तंत्रज्ञान, माहितीसंवाद क्षेत्रात झालेली वाढ व इंटरनेटमुळे हा प्रश्नच्या दारात उभा ठाकला आहे. या गुन्ह्याला कोणत्याही सीमा नाहीत, त्याला जागतिक स्वरुप आलेले आहे.
तस्करीला बळी पडलेल्या महिलांची केवळ सुटका करुन उपयोग नाही तर त्यांना पुन्हा स्वबळावर उभे करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात मुस्कान मोहिमेतंर्गत तस्करीला बळी पडलेल्या १० हजार मुलांची सुटका करण्यात यश आले आहे. मानवी तस्करी करणारे गुन्हेगार तंत्रज्ञानात अत्यंत हुशार असतात त्यामुळे सर्व देशांनी कडक कायद्यांच्या मदतीने एकत्र प्रयत्न केल्यास हे प्रकार कमी करता येतील असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.
महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनीही महिला तस्करीबाबत राज्य सरकार आणि महिला आयोग करत असलेल्या प्रयत्नांबद्दल माहिती दिली. जगातील प्रत्येक देशातील प्रश्न वेगवेगळे प्रश्न असू शकतील मात्र महिलांचे प्रश्न सर्वत्र सारखेच आहेत. महिलांना एक वस्तू म्हणून जगभर पाहिले जाते, हा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. तस्करीतून महिलांची सुटका झाल्यावर त्यांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न योग्य रितीने होण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.
यावेळेस दिशा परिवर्तनाची, सिक्युरिटी जस्टीस, रिस्टोरिंग फ्रिडम या पुस्तकांचे प्रकाशनही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे महिला तस्करीचे दर्शन घडवणारे प्रदर्शन आणि लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी मांडलेल्या रिक्षाचे उद्घाटनही झाले. ही रिक्षा देशात सर्वत्र फिरुन महिला तस्करी विरोधात जागृती करणार आहे.
महिला तस्करीविरोधात लढण्यास पंचसूत्री
सेकंड लेडी ऑफ घाना हाजिया बावुमिया यांनी महिला तस्करीविरोधात एका पंचसूत्रीचा उपयोग करण्याची गरज बोलून दाखवली. सोशलायझेशन, सेन्सटायजेशन, सपोर्ट, सुपरव्हीजन व सिक्युरिटी या पाच तत्वांचा आपण उपयोग करु शकू असे त्या म्हणाल्या.