Join us

पुन्हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:07 AM

काेराेनाचे विघ्न; लग्नसोहळे लॉकडाऊनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या रूपाने आलेल्या विघ्नामुळे यंदा देखील लग्नासाठी महत्त्वाचा असलेला अक्षय ...

काेराेनाचे विघ्न; लग्नसोहळे लॉकडाऊन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या रूपाने आलेल्या विघ्नामुळे यंदा देखील लग्नासाठी महत्त्वाचा असलेला अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात लग्न होतात. मात्र गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर कोरोनाचे सावट आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्याने लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर ज्यांनी लग्नाचा मुहूर्त काढला होता, अशा कुटुंबांचा हिरमोड झाला. अनेकांनी पत्रिका छापून मंगल कार्यालयांचे ही बुकिंग केले होते. मात्र नियम व अटींच्या बंधनामुळे लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय अनेक कुटुंबांनी घेतला. मागच्या वर्षीचा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला, परंतु यंदाच्या अक्षय तृतीयेला लग्न उरकून घेण्याच्या आशेवर असलेल्यांचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा हिरमोड केला. मंगल कार्यालयांचे ही आर्थिक गणित बिघडले. अनेकांनी बुकिंग रद्द केले आहे. यामुळे मंगल कार्यालयांचे मालक व त्यावर अवलंबून असणारे व्यावसायिक व कामगार चिंतेत आहेत.

नियम व अटींच्या बंधनामुळे काही कुटुंबांनी कोर्टात साध्या पद्धतीने लग्न उरकून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मंगल कार्यालये ओस पडत असल्याचे चित्र आहे.

* नियमांचा अडसर

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागल्याने सरकारने लग्न समारंभांवर नियम व अटींची बंधने घातली आहेत. केवळ दाेन तासात आता २५ जणांच्या उपस्थितीतच लग्न समारंभ उरकण्याची अट आहे. यामुळे अनेक जणांनी लग्न रद्द केली, तर काहींनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

* कुटुंब द्विधा मनस्थितीत

लग्नकार्यात केवळ २५ जणांच्या उपस्थितीलाच परवानगी आहे. ही परवानगी ही सहजासहजी मिळत नाही. त्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे लग्न पुढे ढकलावे की कोर्टात साध्या पद्धतीने उरकून घ्यावे अशा द्विधा मनस्थितीत कुटुंबीय आहेत.

- हरिदास धुमाळ (वरपिता)

* घरातल्या घरात लावणार लग्न

लग्नाच्या परवानगीसाठी करावी लागणारी कसरत तसेच नियम व अटी पाहता आम्ही लग्न घरातल्या घरात साध्या पद्धतीने उरकून घेण्याचा निर्णय घेतला आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपणही सरकारच्या नियमांचे पालन करायला हवे.

- प्रभाकर पाटील (वधू पिता)

-----------------------------