Join us

अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना सुरक्षा द्या; कोर्टाला विनंती, दफनविधीसाठी जागाही मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 6:27 PM

Akshay Shinde Encounter Case: अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जागा मिळत नाही. आई-वडिलांना संरक्षण द्यावे, अशी मागणी कोर्टात करण्यात आली आहे.

Akshay Shinde Encounter Case: राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूरमधील खासगी शाळेतील लहान मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा अचानक पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीका केली. मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकरणी पोलिसांना महत्त्वाचे निर्देश दिलेत. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. यातच अक्षय शिंदेचा दफनविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. 

अक्षयच्या वडिलांच्या वकिलांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आम्ही माननीय न्यायालयाला विनंती केली आहे की, बदलापूरमध्ये अक्षय शिंदेच्या मृतदेहाचा दफनविधी करण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी. कारण मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळत नाही. त्या विषयावर सरकारच्या वतीने सांगितले की आम्ही त्याबाबत योग्य ती काळजी घेऊ. पण जागा मिळालेली नाही. सकाळी पुन्हा एकदा अक्षय शिंदेच्या आई वडिलांना बोलवण्यात आले होते. दोन ते तीन ठिकाणी त्यांना जागा दाखवण्यात येईल, असे ते म्हणाले.

किरीट सोमय्यांना संरक्षण दिले, आता अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना सुरक्षा द्या

अक्षय शिंदेच्या आई वडिलांच्या जीवाला धोका आहे त्यामुळे त्यांनी संरक्षण मागितले आहे. अक्षय शिंदेच्या आई वडिलांना संरक्षण दिले जावे, अशी मागणी आम्ही न्यायालयात केली आहे. किरीट सोमय्यांना जसे संरक्षण दिले तसेच अक्षय शिंदेच्या आई वडिलांना सुरक्षा द्यावी. कारण त्यांच्यावर आधीही हल्ला झाला आहे. अक्षय शिंदेने नेमके काय केले? चार्जशीटच समोर आलेली नाही. शाळेचे मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाही हे सरकारचे अपयश आहे, असे वकिलांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी अक्षय शिंदेच्या थेट डोक्यातच गोळी का मारली, अक्षयने जेव्हा पोलिसांकडून पिस्तूल हिसकावून घेतले तेव्हा त्याला ते अनलॉक कसे करता आले, त्याला बंदूक चालवता येत होती का, अशा असंख्य प्रश्नांच्या फैरी झाडत उच्च न्यायालयाने बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीच्या एन्काउंटर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत झाला प्रकार एन्काउंटर असूच शकत नाही, असे परखड मत नोंदविले होते.  

टॅग्स :बदलापूरगुन्हेगारीन्यायालय