अक्षय तृतीया : १० ते १५ टक्क्यांनीच चकाकले सोने
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 08:13 PM2020-04-26T20:13:22+5:302020-04-26T20:18:52+5:30
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याची आॅनलाइन खरेदी झाली असून, हा आकडा केवळ १० ते १५ टक्के एवढा आहे
मुंबई : कोरोनाचा फटका सराफा बाजारासदेखील बसला असून, रविवारच्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याची फार काही खरेदी झालेली नाही. बाजारपेठा बंद असल्याने आॅफलाइन खरेदी झालेली नाही. मात्र उपाय म्हणून अनेक सराफांनी ग्राहकांना आॅनलाइनचा पर्याय दिला होता. त्यासही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. सराफांच्या म्हणण्यानुसार, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याची आॅनलाइन खरेदी झाली असून, हा आकडा केवळ १० ते १५ टक्के एवढा आहे.
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कारणात्सव सर्व बाजारपेठा बंद आहेत. याचा फटका सराफा बाजारालाही बसला आहे. परिणामी अक्षय तृतीयेला १०० टक्के खरेदी होत असलेल्या सोन्याची मागणी लॉकडाऊनमुळे घसरली आहे. रविवारच्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्तरावर हा व्यवहार केवळ १० ते २० आॅनलाईन होईल, अशी शक्यता सराफांनी वर्तविली होती. आणि त्यानुसारच या मुहूर्तावर ही खरेदी केवळ १० ते १५ टक्के झाली आहे. स्नेको गोल्ड अँड डायमंडचे कार्यकारी संचालक सुवणकर सेन यांनी याबाबत सांगितले की, अक्षय तृतीयेला साहजिकच ग्राहकांकडून सोन्याची खरेदी केली जाते. यावेळी कोरोनामुळे आपण ग्राहकांना सोने खरेदीसाठी आॅनलाइनचा पर्याय दिला होता. त्यानुसार सोने खरेदीचा विचार करता ही टक्केवारी १० ते १५ आहे. गेल्या वर्षी विचार करता त्यावेळेस ग्राहकांना सर्व पर्याय उपलब्ध होते. परिणामी त्यावेळी खरेदी ही १०० टक्क्यांच्या आसपास पोहचली होती. यावेळी मात्र केवळ आॅनलाईन हाच पर्याय होता. मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनीही देखील अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सराफ बाजारातील उलाढालीवर माहिती देताना सांगितले होते की सोन्याची खरेदी आॅनलाइन होईल. आणि त्यानुसार सोन्याचा आॅनलाइन खरेदीचा आकडा १० ते १५ टक्क्यांवर पोहचला. दरम्यान, लॉकडाऊन उठल्यानंतर खरेदी मोठया प्रमाणावर होईल. कारण बहुतांश विवाह सोहळे पुढे ढकलण्यात आले आहेत, असे सराफांनी सांगितले.