Join us

अक्षय्य तृतीयेला घरखरेदीसाठी २५ टक्के बुकिंग होण्याची शक्यताही धूसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:06 AM

गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मतसचिन लुंगसेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र सरकारने दिलेल्या मुद्रांक शुल्क सवलतीमुळे आणि गृहकर्जावरील ...

गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत

सचिन लुंगसे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र सरकारने दिलेल्या मुद्रांक शुल्क सवलतीमुळे आणि गृहकर्जावरील कमी झालेल्या व्याजदरामुळे या वर्षी जानेवारी-मार्च तिमाहीत घरांची चांगली विक्री झाली. मात्र काेराेनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आणि अनेक राज्यांतील लॉकडाऊनमुळे, गेल्या नऊ महिन्यांत घरांच्या मागणीने घेतलेली गती मंदावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शुक्रवारच्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नव्या घरांची २५ टक्के बुकिंगही होण्याची शक्यता धूसर असल्याचे गृहनिर्माण क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांनी सांगितले.

मुंबई, पुणे आणि बंगळुरू शहरातील घरांच्या विक्रीत घट झाली आहे. मात्र दिल्ली-एनसीआर, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि अहमदाबाद या शहरांमध्ये मागणीत वाढ झाली. आठ शहरांतील घरांच्या विक्रीची आकडेवारी पाहता जानेवारी ते मार्च २०२१ या तिमाहीत विकल्या गेलेल्या घरांपैकी ४५ टक्के घरे परवडणाऱ्या घरांच्या श्रेणीत म्हणजे ४५ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची होती. सुमारे २६ टक्के घरे ४५ लाख ते ७५ लाख रुपये या किमतीची, १० टक्के घरे ७५ लाख ते १ कोटी रुपये किमतीची तर १९ टक्के घरे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची होती. एकूण मागणीच्या ४४ टक्के मागणी २ बेडरूम हॉल किचन घरांना होती.

भारतातील ८ प्रमुख शहरांमधील नवीन घरांसाठीची ५० टक्के मागणी ४५ लाख रुपये किंवा त्याहून कमी किमतीच्या २ बेडरूमच्या घरांना असल्याचे समोर आले आहे. या आठ शहरांमधील घरांचे विक्री व्यवहार गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त ५ टक्क्यांनी घटले (६६ हजार १७६ घरे) आहेत. हैदराबाद, अहमदाबादमध्ये या वर्षी जानेवारी ते मार्च या काळात गेल्या वर्षीच्या तुलनेत मागणी ५ टक्क्यांनी वाढली आहे.

* पुढील ३ महिने चित्र कायम राहणार

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमधील गृहनिर्माण क्षेत्रावर लॉकडाऊनमुळे अत्यंत वाईट स्थिती ओढावली आहे. गृहनिर्माण क्षेत्रातील बांधकाम प्रकल्प सुरू असले तरी तेवढ्या वेगाने कार्यरत नाहीत. लोकांचा त्यास म्हणावा तसा प्रतिसाद नाही. गेल्या वर्षीही अशीच परिस्थिती होती. त्यामुळे आजच्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गृह निर्माण क्षेत्रात फार काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार नाहीत. रिअल इस्टेट सेक्टरचे मार्केट १०० टक्के डाऊन आहे. तरीही या शुभमुहूर्तावर नव्या घरांचे २५ टक्के बुकिंग होईल, अशी शक्यता आहे. लॉकडाऊन आहे. आर्थिक घडामोडींचा वेग कमी झाला आहे. लोकांची प्राथमिकता बदलली आहे. पुढील ३ महिने अशीच अवस्था राहण्याची शक्यता आहे.

- आनंद गुप्ता,

अध्यक्ष, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया.

..................................