Join us

'अलग मेरा यह रंग है'... अमृता फडणवीसांच नवं गाणं महिला दिनी होतंय रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 9:25 AM

काही दिवसांपूर्वी मी महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा विजया राहटकर यांना भटेले.

मुंबई - महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही एक गाणं घेऊन येत आहोत. अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हे गाणं आहे. पण, मला विश्वास आहे, की केवळ अ‍ॅसिड हल्ल्याने पीडित झालेल्याच महिला नाही, तर प्रत्येक महिला या गाण्यामुळे प्रोत्साहित होईल, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले. संगीत क्षेत्रातून आपली वेगळी ओळख निर्माण करताना अमृता यांनी विधायक कामेही केली आहेत. आता, महिला दिनाचे औचित्य साधत अमृता यांनी अ‍ॅसिड पीडितांना प्रोत्साहन देणारे गीत सादर केलंय. 

अमृता यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली. अलग मेरा यह रंग है... असे या गाण्याचे बोल असल्याचे त्यांच्या ट्विटर पोस्टवरुन दिसून येते. फेस कॅन डिस्ट्रॉय बट नॉट द सोल म्हणजे केवळ चेहरा नष्ट होऊ शकतो, पण मन/ आत्मा कधीही नाही, अशीही टॅगलाईन या गाण्यासोबत जोडली आहे. या, गाण्याबाबत अमृता यांनी माहिती देताना, अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांना भेटल्याची आठवण सांगितली. 

''काही दिवसांपूर्वी मी महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा विजया राहटकर यांना भटेले. त्यांच्या माध्यमातून मी अनेक अॅसिड हल्ल्याने पीडित झालेल्या महिलांच्या गाठी-भेटी घेतल्या. त्यावेळी, या मुलींनी त्यांची पीडित व्यथा माझ्यासमोर मांडली. लोकं आमची दया करतात, पण आम्हाला दया किंवा सहानुभूती नकोय. आम्हाला लोकांची साथ हवीय,'' असे अमृता यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीशी दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. दरम्यान, अमृता फडणवीस आपल्या ट्विटरमुळे नेहमीच चर्चेत असतात. आदित्य ठाकरेंच्या ट्विटला रिप्लाय असेल किंवा शिवसेनेच्या भूमिकेवर केलेली टीका असेल. त्यामुळे अमृता यांना शिवसेना समर्थकांनी ट्रोलही केलं होतं. मात्र, यांपैकी अनेक ट्रोलर्संकडून मला शिकायला मिळतं, त्यानुसार आपल्यात बदल करता येतो, असे सकारात्मक उत्तर अमृता यांनी दिलंय. 

टॅग्स :अमृता फडणवीसमुंबईसोशल मीडियादेवेंद्र फडणवीस