मुंबई : राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नगर, जळगाव, अमरावती, सातारा, बुलडाणा, नागपूर या नऊ जिल्ह्यांमध्ये संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. मागील १६ दिवसांत राज्यभरात ४७ हजार ७४६ रुग्ण वाढले असून, त्यात या नऊ जिल्ह्यांमधील ३३ हजार ९५२ रुग्णांचा समावेश आहे. मुंबईत १ फेब्रुवारी रोजी ३ लाख ९ हजार ३०३ कोरोनाचे रुग्ण होते तर सध्या ३ लाख १५ हजार ७५१ रुग्ण आहेत. मागील १६ दिवसांत शहर, उपनगरात ६ हजार ४४८ रुग्णांची वाढ झालेली दिसून येत आहे.
ठाण्यात १ फेब्रुवारी रोजी २ लाख ६८ हजार ९५० रुपये होते, तर सध्या येथील रुग्णसंख्या २ लाख ७३ हजार ७३१ आहे. मागील पंधरवड्यात ४ हजार ७८१ रुग्ण वाढले. पुण्यात फेब्रुवारीच्या सुरुवातीला ३ लाख ८८ हजार ७६६ रुग्णांची नोंद झाली होती. या जिल्ह्यातील सध्याची रुग्णसंख्या ३ लाख ९६ हजार १७१ इतकी आहे. मागील सोळा दिवसांत या ठिकाणी ७ हजार ८०५ रुग्णांची वाढ झाली.